ऐन दिवाळीत नोकरीवर गदा; `या` बड्या कंपन्यांमधून शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ
Layoffs News : ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये मिळणारा पगार, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि इतरेतर गोष्टींचा फायदा पाहता अनेकांनाच या नोकऱ्या हव्याहव्याशा वाटतात, पण...
Job News : जगभरात डगमगणारी अर्थव्यवस्था पाहता याचे थेट परिणाम नोकरदार वर्गावर दिसून येत आहेत. 2022 च्या अखेरीपासूनच अनेक मोठ्या संस्थांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली. गुगल (Google), फ्लिपकार्ट या कंपन्यांसोबतच इथं भारतातही काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिला. त्यात आता आणखी काही नावांची भर पडली आहे. मुख्य म्हणजे ऐन दिवाळीच्याच दिवसांमध्ये नोकरी गमावणाऱ्यांचा आकडा मोठा असल्यामुळं याची बरीच चर्चाही होत आहे.
जागतिक स्तरावरील प्रख्यात कंपनी अॅमेझॉन त्यांच्या गेमि डिव्हिजनमधी 180 कर्मचाऱ्यांना नारळ देत आहे. ट्विचवर स्ट्रीम होणारा क्राऊन चॅनलही कंपनीनं बंद केला आहे. कंपनीनं सध्या गेम ग्रोथ बंद केलं असून, अॅमेझॉन गेम्सच्या वाईस प्रेसिडेंटपदी असणाऱ्या क्रिस्तोफर हार्टमॅन यांच्या नावे कर्मचाऱ्यांना मेमो पाठवण्यात आला आहे.
मेमोमध्ये लिहिल्यानुसार, कंपनीकडून व्यावसायिक दृष्टीकोनात बदल करण्यात आला असून, संसाधन व्यवस्थापनामध्येही काही बदल करण्यात येणार आहेत. ज्यामुळं 180 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. दरम्यान, सध्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून व्यक्तिगतरित्या मदत करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जात आहे.
Tata Group Layoff
टाटा ग्रुप (Tata Group) च्या टाटा स्टीलकडूनही कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार IJmuiden प्लांटमधील जवळपास 800 कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणली जाणार आहे. या प्लांटमध्ये सध्या 9200 कर्मचारी कार्यरत असून तो अॅम्स्टरडॅमपासून 30 किमी पश्चिमेला असणाऱ्या डच किनाऱ्यावर उभा आहे. नफा वाढवण्याच्या प्रयत्नांत या प्लांटमधून कंपनी कर्मचारी कपात करणार असल्याचं कारण पुढे करण्यात येत आहे.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather : 4 दिवस पावसाचे... हवामान विभागाचा इशारा पाहून तुमचं डोकं चक्रावेल
कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कंपनीतं स्थान अबाधित ठेवण्यासोबतच उत्पादन शुल्कात कपात करण्यासोबतच आणखी प्रयत्नही केले जाणं महत्त्वाचं आहे. शिवाय सध्या कंपनी Clean Energy कडे अधिक प्राधान्य देत असून, त्याचट दृष्टीनं मोठी गुंतवणूकही केली जात आहे. थोडक्यात कंपनीकडून संपूर्ण कार्यपद्धतीतच बदल केले जाणार असल्यामुळं कर्मचारी कपातीचा पर्याय निवडावा लागला आहे असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.