चीनमध्ये हुकूमशाही! बीजिंगमध्ये 14 लाख जणांना अटक
चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष (China President) शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या विरोधात मोठ्या लोकसंख्येचा संताप उफाळून येत आहे. आंदोलनांमुळे लाखो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले आहे.
बिजिंग : शी जिनपिंग (Xi Jinping) तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी (President of the People's Republic of China) विराजमान होणार आहे. चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे नेते 16 ऑक्टोबरला एकमताने शी जिनपिंग यांची निवड करणार, असं बोललं जात आहे. पण या राज्याभिषेकापूर्वी विरोध लक्षात घेता प्रशासनानं धरपकड सुरु केली आहे. शी जिनपिंग यांच्या झिरो कोविड धोरणामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. नागरिकांनी राष्ट्राध्यक्ष हुकूमशहा असल्याचे पोस्टर-बॅनर लावले आहेत. यामुळे आतापर्यंत 14 लाख लोकांना अटक करण्यात आली आहे. यासाठी जून महिन्यापासूनच 100 दिवसांची मोहीम सुरु करण्यात आली होती. (anger of a large population is erupting in China against president xi Jinping)
'आम्हाला अन्न हवंय, कोरोना तपास नको' आणि 'सांस्कृतिक क्रांती नको, आम्हाला सुधारणा हवी आहे' असं आंदोलनकर्त्यांनी पोस्टर्समध्ये लिहिलं आहे. तसेच शी जिनपिंग हे हुकूमशहा असल्याचं सांगत आंदोलन करण्याचे आवाहन केलं आहे.
एका रिपोर्टनुसार, जिनपिंग यांच्या विरोधातील बंड दडपण्यासाठी लॉकडाऊनचा अवलंब करण्यात आला आहे. चीनच्या शाक्सी प्रांतातील फन्यांग शहरात लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. मंगोलियाची राजधानी होहोट येथे बाहेर फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. चीनमधील अनेक शहरांमध्ये शाळा आणि पर्यटनस्थळेही बंद करण्यात आली आहेत.