तालिबानचं समर्थन करणं पडलं महागात, भारतात 14 जणांना पोलिसांनी केली अटक
तालिबानचं समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणं पहागात पडणार आहे.
गुवाहाटी : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यापासून भारतातून काही जणांनी तालिबानचं समर्थन केलं होतं. यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्टही करण्यात आल्या होत्या. पण तालिबानच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणं महागात पडणार आहे.
सोशल मीडियावर अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जाचे समर्थन केल्याप्रकरणी आसाममध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्री आसाम पोलिसांनी मोठी कारवाई करत 14 जणांना वेगवेगळ्या भागातून अटक केली आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर क्रिया (प्रतिबंध) कायदा, आयटी कायदा आणि सीआरपीसीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वांनी कट्टरपंथी इस्लामिक संघटनेचं कौतुक केलं होतं आणि अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्याची घटना योग्य असल्याचं म्हटलं होतं. याप्रकरणी मेट्रोपोलिटन, बारपेटा, धुबरी आणि करीमगंज जिल्ह्यातून प्रत्येकी दोन जणांना तर दरांग, कचर, हैलाकंडी, दक्षिण सलमारा, गोलपारा आणि होजाई जिल्ह्यातून प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली आहे.
आसामचे पोलीस महासंचालक जीपी सिंह यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली, तसंच सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट करताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अशा प्रकारच्या पोस्ट न करण्याबरोबरच अफगाणिस्तान-तालिबान वादावर पोस्ट लाईक करतानाही सावधान राहण्याचं आवाहन करतानाच दंडात्मक कारवाईलाही सामोरं जावं लागण्याचा इशारा दिला आहे.
तालिबानच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्यांवर आसाम पोलीस कडक कारवाई करत असल्याची माहिती उप पोलीस महासंचालक बरुआ यांनी दिली आहे. तसंच अशी कोणतीही गोष्ट आढळल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.