एका पित्याची हृदयद्रावक कहाणी, भयंकर थंडीत चिमुरडी बर्फासारखी गोठली, पण ते वाचवू शकले नाहीत
`तीला हात लावला तेव्हा ती बर्फासारखी गोठली होती`, वडिलांची काळीज पिळवटणारी प्रतिक्रिया
Syria News : हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळे डोळ्यासमोर आपल्या चिमुरडीचा मृत्यू झाला, पण हतबल पिता मुलीला वाचवण्यासाठी काहीच करु शकला नाही. ही हृदयद्रावक घटना आहे, युद्धाचे चटके सोसणाऱ्या सीरियामधली (Syria). गृहयुद्धामुळे विस्थापित छावण्यांमध्ये (IDP Camps) राहणारे सीरियन लोक अतोनात वेदना सहन करत आहेत.
चिमुरडीचा वेदनादायी मृत्यू
कडाक्याच्या थंडीमुळे सीरियाच्या इदलिब (Idlib) प्रांतातील विस्थापन शिबिरांमध्ये एकाच रात्रीत सात दिवसांच्या मुलीसह दोन मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सीरियातील विदारक परिस्थिती पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. इदलिब हे विस्थापित झालेल्या लाखो सीरियन लोकांचं घरं आहे. ज्यांनी दशकभर सुरु असलेल्या गृहयुद्धामुळे आपलं हक्काचं घर सोडून पलायन करावं लागलं आहे.
थंडीमुळे चिमुरडी बर्फासारखी गोठली
हतबल असलेल्या मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया काळीज पिळवटून टाकणारी होती. 'जेव्ही मी तिला स्पर्श केला तेव्हा ती बर्फासारखी गोठली होती' असं मुलीचे वडिल मोहम्मद अल हसन म्हणाले. अल-रहमान रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं की मुलीला रुग्णालयात दाखल करेपर्यंत थंडीमुळे तिंच अंग निळं झालं होतं, तिच्या नाका तोंडातून रक्त येत होतं.
थंडीमुळे लहान मुलांचा मृत्यू
उत्तर इदलिबमधील अल-जबाल विस्थापन शिबिरात आपल्या कुटुंबासह राहणाऱ्या दोन महिन्यांच्या मुलाचाही थंडीमुळे मृत्यू झाला. गेल्या दोन आठवड्यांत तीन मुलांचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या दोन आठवड्यांमध्ये, उत्तर-पश्चिम सीरियामध्ये तीव्र थंडीने कहर केला आहे. या ठिकाणी 4 दशलक्षाहून अधिक विस्थापित सीरियन राहतात. सीरियामध्ये २०११ मध्ये बंडखोरी सुरू झाली. तेव्हापासून सुमारे पाच लाख लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोक बेघर झाले आहेत.