मॉस्को : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय रशियातील एका स्फोटानंतरही आलाय. रशियाच्या एका गगनचुंबी रहिवासी इमारतीत नववर्षाच्या पूर्वसंध्येला गॅस स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली. या स्फोटात तब्बल २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. परंतु, अवघ्या १० महिन्यांचं बाळ मात्र या घटनेत बचावलं... या घटनेला चमत्कार म्हणा किंवा सुदैव... पण, या चिमुरड्याला बाहेर काढल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. स्फोटानंतर तब्बल ३५ तास हे बाळ मलब्यात अडकलेलं असूनही जिवंत सापडल्यानंतर अनेकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासदेखील बसत नव्हता. उल्लेखनीय म्हणजे, इथं सध्या उणे २७ डिग्रीपर्यंत तपमान आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोठवणाऱ्या थंडीत बचावकार्य सुरु आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर जवळ ३५ तासांनी धुळीनं माखलेल्या आणि अंगावर केवळ झबलं आणि गुलाबी मोजे घातलेल्या या चिमुरड्याला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर या चिमुरड्याला त्याच्या आईशी भेटवण्यात आलं... तत्काळ त्याला मेडिकल सेवा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु, या चिमुरड्याची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय.



बचावकार्यात जुंपलेल्या जवानांना मलब्यातून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी शोध घेतला असता त्यांना हे बाळ सुखरूप हाती लागलं. प्रचंड ढिगाऱ्यामध्ये सापडलेलं बाळ शोधण्यासाठी प्रशिक्षित कुत्र्यांचीही मदत घेण्यात आली. 


अजूनही मलब्यातून मृतदेहांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. परंतु, आता मात्र मलब्यात जिवंत व्यक्ती सापडण्याची शक्यता कमीच आहे. २६ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यात तीन लहानग्यांचाही समावेश आहे... तर पाच जणांना जिवंत बाहेर काढण्यात जवानांना यश आलंय.