Sheikh Hasina Resignation : मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या आंदोलनांमुळे बांग्लादेशमध्ये मोठा हिंसाचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर तिथली सत्ता आता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता आहे. दरम्यान शेख हसीना यांनी बांग्लादेश सोडलाय. शेख हसीना यांचं विमान दिल्लीतील हिंडन एअरबेसवर उतरलं. संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमाराला त्यांचं विमान हिंडन एअरबेसवर उतरलं. त्यावेळी त्यांचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी शेख हसीना यांचं स्वागत केलं. तर थोडा वेळ भारतात थांबून शेख हसीना पुढील प्रवासाला सुरुवात करणार आहेत. दरम्यान त्या लंडनला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. अजित डोवाल यांनी शेख हसीना यांच्याशी तब्बल 1 तास चर्चा केली, अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी विदेश मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली. 



बांगलादेशात आरक्षणासाठी उभारण्यात आलेलं आंदोलन हिंसक झालंय. या आंदोलनात सुमारे 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी जीव गमावलाय. आरक्षणाच्या विरोधातून सुरू झालेल्या आंदोलनाचा प्रवास सत्ता बदलापर्यंत झालाय. शेख हसिना यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार होत भारतात पोहचल्यात. बांगलादेशात लष्कराच्या अधिपत्याखाली आता नवीन सरकार स्थापण्याची तयारी सुरू आहे. लष्करप्रमुख  जनरल वकार-उज़-ज़मान यांच्या इशाऱ्यावरच नव्या सरकारचा कारभार चालणार आहे. लष्करानं सत्ता काबीज केल्यानंतर भारत आणि बांगलादेशाचे संबंध पूर्वीप्रमाणेच मधुर राहतील का? याची शंका आहे.



दरम्यान, भारत बांगलादेश सीमेवरील मनकाचर आसाममधील सीमा सील करण्यात आली आहे. तर ढाका एरोड्रोम बंद असल्याची सूचना, भारतीय विमानतळ प्राधिकरणाला मिळाली आहे. त्यामुळे एअर इंडियासह इतर विमान कंपन्यांनी आपली बांग्लादेशची सेवा रद्द केली आहे. तसंच भारत-बांग्लादेश दरम्यानची रेल्वेसेवा रद्द करण्यात आलीये. दरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्रालय या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. तर दिल्लीतील बांग्लादेश उच्चायुक्तालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.