Bangladesh crisis : बांगलादेशात पंतप्रधान शेख हसिना (Sheikh Hasina resigns) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि बांगलादेशमधून पळ देखील काढला आहे. लष्कर प्रमुखांनी यावर अधिकृतरित्या माहिती दिली. शेख हसिना 2009 पासून पंतप्रधान पदावर होत्या. गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या आरक्षणाच्या आंदोलनावरून शेख हसिना यांच्यावर राजीनामा देण्याचं प्रेशर होतं, अशी माहिती देखील समोर आली होती. अशातच आता शेख हसीना यांच्या घरावर हल्ला झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशमधील व्हायरल व्हिडिओमध्ये आंदोलक पीएम हाऊसमध्ये घुसले आणि मस्ती करताना दिसत होते. आंदोलक बेडवर बूट घालून पडलेले दिसले. अनेक आंदोलक स्वयंपाकघरातही घुसले आणि तेथे तयार केलेले पदार्थ खाताना दिसले. तर काहींनी मिठाईवर ताव मारला. तर काहींनी बाहेरील नदीत अंघोळ करताना दिसले. तर काहींनी घराची तोडफोड देखील केली. त्यामुळे आता बांगलादेशात सध्या हिंसाचार आणि अराजकतेचे वातावरण दिसत आहे.




सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेख हसीना यांचे हेलिकॉप्टर भारतातील त्रिपुरा येथील आगरतळा विमातळावर लँड झालं आहे. शेख हसीना यांच्यासह त्यांची बहिण आणि काही कुटुंबिय देखील सोबत असल्याचं समजतंय. त्यामुळे आता भारत शेख हसीना यांना संरक्षण देणार का? असा सवाल विचारला जात आहे. 



लष्करप्रमुख म्हणाले...


पंतप्रधान हसिना यांनी राजीनामा दिला आहे. अंतरिम सरकार देश चालवेल. आम्ही देशात पुन्हा शांतता प्रस्थापित करु. नागरिकांनी हिंसाचार थांबवावा असं आमचं आवाहन आहे, असं लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांनी म्हटलं आहे. आम्ही गेल्या काही आठवड्यांत झालेल्या सर्व हत्यांची चौकशी करू असं आश्वासनही देखील लष्करप्रमुखांनी दिलं आहे. त्यामुळे आता शेख हसीना पुन्हा बांगलादेशात जाण्याचा निर्णय घेणार का? असा सवाल देखील विचारला जात आहे.