Maldives President Muizzu : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि मालदीवमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दोन्ही देशांमधील वातावरण तापलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर मालदीवच्या पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. एवढं सगळं होऊनही मालदीव आपल्या भूमिकेत ठाम असल्याचे दिसत आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी चीन दौऱ्यावरुन परत येताच नाव न घेता भारताला धमकीवजा इशारा दिला होता. मात्र आता राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांना त्यांच्याच देशात मोठा धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू चीन दौऱ्यावर गेले होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भेटीनंतर पाच दिवसांचा दौरा संपवून ते मायदेशी परतले आहेत. मायदेशी परतताच त्यांचे सूर बदलले आणि त्यांना आम्हाला धमकावण्याचा परवाना कोणाकडे नाही असं विधान केलं आहे. "आम्ही एक लहान देश असू शकतो. पण याचा अर्थ कोणालाही आमचा छळ करण्याचा परवाना दिलेला नाही, असे मुइज्जू म्हणाले. मुइज्जू यांनी यावेळी प्रत्यक्षपणे कोणाचंही नाव घेतलं नाही. पण त्यांनी भारताला इशारा दिल्याचे म्हटलं जात आहे.


मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना मोठा धक्का बसला आहे. राजधानी मालेच्या महापौर निवडणुकीत भारत समर्थक विरोधी मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीने मोठा विजय मिळवला आहे. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना धक्का देत, भारताच्या समर्थक मालदीव्हियन डेमोक्रॅटिक पार्टीने राजधानी मालेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. एमडीपीचे उमेदवार अॅडम अझीम हे मालेचे नवे महापौर निवडून आले आहेत. हे पद मुइज्जू यांच्याकडे होते. मुइझू यांनी गेल्या वर्षी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी पदाचा राजीनामा दिला होता.


मालदीवच्या प्रसारमाध्यमांनी अझीम यांच्या विजयाचे वर्णन मोठा विजय असे केले आहे. मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे नेतृत्व भारताचे समर्थक माजी अध्यक्ष मोहम्मद सोलिह यांच्याकडे आहे. मोहम्मद सोलिह हे चीन समर्थक नेते मुइज्जू यांच्याकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. मात्र आता त्यांनी पुन्हा मुइज्जू यांना मोठा धक्का दिला आहे. 41 बॉक्सच्या मोजणीनंतर, विरोधी पक्षाचे एमडीपी नेते अॅडम अझीम यांनी 5,303 मतांनी मोठी आघाडी घेतली. तर मुइज्जू यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी) नेते ऐशाथ अझीमा शकूर यांना केवळ 3,301 मते मिळाली.


कसा सुरु झाला वाद?


भारतासोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मालदीवमध्ये महापौरपदासाठी निवडणूक पार पडली. मात्र चीनमधून परत येताच मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना मोठा धक्का बसला. पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपला भेट दिली आणि त्याचे फोटो शेअर केले. यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि भारताविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली. यानंतर भारताकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे मालदीव सरकारने ही टिप्पणी करणाऱ्या तीन मंत्र्यांना निलंबित केले होते.