नवी दिल्ली: काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या सगळ्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊलमधील एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हीडिओत सेऊलमधील सार्वजनिक ठिकाणी पाकिस्तानी नागरिकांचा एक जमाव भारतविरोधी घोषणा देताना दिसत आहे. हा सगळा प्रकार सुरु असताना योगायोगाने भाजप नेत्या शाझिया इल्मी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही नेते याठिकाणी उपस्थित होते. 


पाकिस्तानी जमाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविरोधात घोषणा देत असल्याचा प्रकार सहन झाला नाही. त्यामुळे शाझिया इल्मी आणि इतर नेत्यांनी थेट जमावासमोर जाऊन त्यांना जाब विचारला. त्यावेळी पाकिस्तानी जमाव आणखीनच आक्रमक झाला आणि त्यांनी जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून शाझिया इल्मी आणि भाजपच्या इतर नेत्यांनीही 'भारत जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. हा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. 



दरम्यान, या सगळ्या प्रकाराबद्दल शाझिया इल्मी यांनी प्रसारमाध्यमांसमोर खुलासाही केला. आम्ही सेऊलमध्ये संयुक्त शांतता संघटनेच्या बैठकीसाठी गेलो होतो. ही बैठक आटोपल्यांतर आम्ही भारतीय दुतावासात जाऊन राजदुतांची भेट घेतली.


तेथून हॉटेलच्या दिशेने परतत असताना आम्हाला एक पाकिस्तानी नागरिकांचा जमाव दिसला. या सगळ्यांच्या हातात पाकिस्तानचे झेंडे होते आणि ते भारताविरोधात घोषणाबाजी करत होते. मोदी दहशतवादी, भारत दहशतवादी, अशा घोषणा ते सातत्याने देत होते. त्यावेळी आमच्या देशाला आणि पंतप्रधानांना दुषणे देऊ नका, हे सांगणे आम्हाला कर्तव्य वाटले. त्यामुळेच आम्ही जमावासमोर गेल्याचे शाझिया इल्मी यांनी सांगितले.