ब्राझिलिया: ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जाएर बोल्सोनारो Jair Bolsonaro यांना कोरोना व्हायरसची Coroavirus लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ६५ वर्षीय बोल्सोनारो यांना गेल्या काही दिवसांपासून ताप आणि कोरोनाची इतर लक्षणे जाणवत होती. अखेर सोमवारी चौथ्यांदा चाचणी झाल्यानंतर बोल्सोनारो यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा धोका फारशा गंभीरतेने न घेतल्यामुळे बोल्सोनारो मध्यंतरी चर्चेत आले होते. कोरोना हा साध्या तापासारखा आहे, असे बोल्सोनारो यांनी म्हटले होते. त्यामुळे ब्राझीलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग किंवा लॉकडाऊन करण्यासही बोल्सोनारो यांचा विरोध होता. आपल्यासाठी देशाची अर्थव्यवस्था अधिक महत्त्वाची असल्याचेही वक्तव्यही त्यांनी केले होते. 

बोल्सोनारो यांच्या या धोरणांमुळे ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. कोरोना रुग्णसंख्येच्याबाबतीत ब्राझील जगात दुसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत १,६२३,२८४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. 

२० मार्च रोजी बोल्सोनारो यांनी कोरोना हा साध्या तापासारखा असल्याचे विधान केले होते. त्यावेळी ब्राझीलमध्ये कोरोनबाधितांची संख्या अवघी ४० हजार इतकी होती. तर मृतांचा आकडाही तीन हजार इतका होता. मात्र, बोल्सोनारो यांच्या याच निष्काळजी धोरणांमुळे ब्राझीलमध्यो कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. 


अखेर सरकारला जाग आल्यानंतर सोमवारपासून ब्राझीलमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आल होते. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी बोल्सोनारो यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. विशेष गोष्ट म्हणजे बोल्सोनारो यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती पत्रकारपरिषद घेऊन दिली. यावेळीही फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले होते. त्यामुळे सोशल मीडियावर बोल्सोनारो यांनी टीकेला सामोरे जावे लागले.