४७ वर्षानंतर ब्रिटन युरोपीय समुदायातून बाहेर, भारतावर काय होणार परिणाम?
ब्रिटनचा मोठा निर्णय
लंडन : चार वर्षाच्या चर्चेनंतर ब्रिटनच्या संसदेने ब्रेग्झिट विधेयकाला मंजुरी दिली आणि त्यानंतर शुक्रवारी रात्री ब्रिटन अधिकृतपणे युरोपीय समुदायातून मुक्त झाला आहे. यावेळी ब्रेग्झिट समर्थकांनी रस्त्यांवर उतरून आनंदाने जल्लोष केला. तसच ब्रुसेल्सच्या युरोपीन संघाच्या मुख्यालयावरुन ब्रिटनचा झेंडाही हटवण्यात आला. माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी या मुद्दय़ावर जनमत घेण्याचे मान्य केले होते. त्यानंतर २०१६ मध्ये हे जनमत झाले. त्यात ५२ टक्के लोकांनी ब्रेग्झिटच्या बाजूने कौल दिला तर ४८ टक्के लोकांनी ब्रेग्झिटच्या विरोधात कौल दिला. सार्वत्रिक निवडणुकीतील यशानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कुठल्याही परिस्थितीत ब्रेग्झिट तडीस नेण्याचा निर्धार केला होता.
युरोपीय समुदायाच्या वतीनेही करारावर स्वाक्षऱ्यांचे सोपस्कार पार पडले. ब्रिटनची पुढील वाटचाल कशी होते याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमैन्युअल मॅक्रां यांनी मात्र ब्रिटनचं स्वातंत्र ही युरोपातील ऐतिहासिक चेतावनी असल्याचं म्हटलं आहे.
युरोपीय समुदायाच्या ३ प्रमुखांनी ब्रिटन वेगळा झाल्याने याचं स्वागत केलं आहे. ही युरोपसाठी नवी सकाळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. युरोपीय समुदायाने स्पष्ट केलं आहे की, ते ब्रिटन समोर झुकणार नाहीत.
भारत-ब्रिटन संबंध मजबूत होणार
ब्रिटन अधिकृतपणे युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यानंतर भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंध सुधारणार आहेत. ब्रिटनला आता इतर देशांसोबत व्यापार आणि करार करण्यासाठी स्वातंत्र्य मिळणार आहे.
कोबरा बीयरचे संस्थापक आणि कनफेडरेशन ऑफ ब्रिटीश इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष लॉर्ड लॉर्ड करण बिलिमोरिया यांनी म्हटलं की, 'ब्रिटनसाठी भारत एक महत्त्वाचा भागीदार ठरणार आहे. युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यानतंर ब्रिटन नवीन भविष्य ठरवू शकणार आहे.'