मुंबई : बातमी एका सुल्तानाची. इंडोनेशियाजवळ असलेल्या ब्रुनेई या छोट्याशा देशाच्या सम्राटाची संपत्ती ऐकलीत, तर तुम्ही थक्क व्हाल. सोन्याचा कळस असलेल्या महालात राहणाऱ्या सुल्तानाच्या गडगंज संपत्तीचा हा लेखाजोखा. महालाचा कळस 22 कॅरेट सोन्याचा असून 7 हजार आलिशान लक्झरी कार्स आहेत. 600 रोल्स रॉयस, 300 फरारी असून घोड्यांसाठी एअर कंडिशन तबेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही सगळी संपत्ती एका माणसाची आहे, असं तुम्हाला सांगितलं तर धक्का बसेल. पण हे खरं आहे. नकाशावर शोधताना कष्ट पडतील अशा ब्रुनेई देशाचे सुल्तान हसनल बोलकिया यांच्या अवाढव्य संपत्तीची मोजदाद करणंही अवघड... सुरूवात करुयात त्यांच्या अलिशान महालापासून.



  


नुरुल ईमान पॅलेस नावाचा हा राजमहाल तब्बल 20 लाख स्केअर फूट जागेत वसलाय. 1984मध्ये हा महाल उभारण्यात आला. महालाच्या कळसावर 22 कॅरेट सोनं मढवलं असल्याचं बोललं जातं. या राजमहालामध्ये सतराशेपेक्षा जास्त खोल्या, 257 स्नानगृह आणि 5 स्वीमिंग पूल आहेत. गाड्या ठेवण्यासाठी 110 गॅरेज आहेत. विशेष म्हणजे 200 घोडे मावतील एवढा एअर कंडिशन्ड तबेला या महालात आहे. या महालाची किंमत 2550 कोटी रुपये असल्याचं बोललं जातं आहे.


याखेरीज सुल्तान बोलकिया यांच्याकडे 7 हजार लक्झरी कार्स आहेत. त्यांची एकत्रित किंमत 341 अब्ज रुपये आहे. या कार कलेक्शनमध्ये 600 रोल्स रॉयस आणि 300 फरारी आहेत. याखेरीज सुल्तानाकडे 5 प्रायव्हेट जेट असून त्यातल्या एका विमानात सोन्याची सजावट असल्याचीही माहिती आहे. हसनल बोलकिया 1980पर्यंत जगातले सर्वात श्रीमंत सुल्तान होते. आजमितीस त्यांची संपत्ती 14 हजार 700 कोटी रुपये आहे. तेलाच्या विहिरी आणि नैसर्गिक वायूचे साठे यातून त्यांनी ही गडगंज संपत्ती कमावली आहे.