नवी दिल्ली : लग्नसोहळा म्हटलं की उत्साह आणि अनोखा थाट आलाच. पण, कधी तुम्ही डोळे दिपवणारा लग्नाचा थाट पाहिलाय का? पाहिलाही असेल, पण आता तुम्हाला ज्या लग्नाची माहिती आम्ही देणार आहोत ते पाहून सारं जग अवाक् झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रुनेईचे सुल्तान Hassanal Bolkiah यांची मुलगी राजकुमारी फादजीला लुबाबुल बोल्किया हिच्या लग्नाचा हा थाट. तब्बल सात दिवसांसाठी तिचा हा विवाहसोहळा चालला. 


लग्नासाठी खास कपडे तयार करण्यात आले होते. यापैकी काही कपड्यांवर तर हस्तिदंताचं कामही करण्यात आलं होतं. शाही जोड्याच्या कपड्यांवर जरतारी काम करण्यात आलं होतं. 


राजकुमारीनं लग्नाच्या ड्रेसवर एक मुकुटही घातलेला ज्यामध्ये जगभरातील काही मौल्यवान रत्न लागली होती. 


ब्रुनेईच्या राजांच्या महालात म्हणजेच इस्ताना नुरुल ईमान इथं हा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. हा जगातील सर्वात मोठ्या शाही महालांपैकी एक आहे. जिथं 1700 हून अधिक खोल्या आहेत. इथंच सध्याचे सुल्तान यांचं निवासस्थानही आहे. 


राजकुमारी फादजीला यांना ब्रुनेई इथं 'स्पोर्टी प्रिंसेस' या नावानंही ओळखलं जातं. त्या ब्रुनेईच्या राष्ट्रीय हॉकी संघाच्या कर्णधारही आहेत. ब्रिटनच्या किंग्सन विद्यापीठातून त्यांनी इंटरनॅशनल स्टडीजची पदवी घेतली आहे. 


तर, राजकुमारीनं हल्ट इंटरनॅशनल बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचं उत्तशिक्षण घेतलं आहे. 



राजकुमारी फादजीला सुल्तान हसनल बोल्किया यांची दुसरी पत्नी, हजाह मरियम यांची मुलगी आहे. फादजीला यांचे धाकटे बंधू राजकुमार मतीन यांनी लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. 


ब्रुनेई हा कच्च्या तेलानं संपन्न असा देश आहे. जगातील सर्वात श्रीमंत शासकांमध्ये येथील सुल्तानांचं नाव घेतलं जातं. त्यांना एकूण 12 मुलं आहेत. 



ब्रुनेईचे सुल्तान अतिशय आलिशान आयुष्य जगतात, त्यांच्या आवडीनिवडींवरून हे लगेचच लक्षात येतं.



मुख्य म्हणजे अतिशय दिमाखदार अशा या विवाहसोहळ्या जगभरातून पाहुण्यांची हजेरी होती. पण, इथं कोरोना नियमही तितक्याच काटेकोरपणे पाळले जात असल्याचंही पाहायला मिळालं.