Chandrayaan 3 : भारताचं चांद्रयान 3 आता चंद्रापासून अवघ्या काही किलोमीटरच्याच अंतरावर आहे. ज्या चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी जगभरातील अंतराळ संशोधन संस्था प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत त्याच चंद्राबाबतचं कुतूहल दर दिवशी नव्यानं समोर येत आहे. लहानपणापासून गोष्टी आणि कवितांमध्ये असणारा, चित्रांमधून भेटणारा आणि कोणत्याही प्रवासात साथ देणारा हा चंद्र नेमका किती वयाचा आहे माहितीये? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका नव्या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार चंद्राचा एक भाग तज्ज्ञांनी आतापर्यंत वर्तवलेल्या अंदाजाहूनही बऱ्याच काळ आधीपासून अस्तित्वात आहे. अंदाज बांधायचा झाल्यास चंद्राचं वय 4.5 अब्ज वर्षे किंवा त्याहूनही जास्त आहे. कैक वर्षांपूर्वी एक महाकाय लघुग्रह पृथ्वीवर आदळला ज्यामुळं धुळ आणि काही मोठाले पर्वतांचे तुकडे पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडले. त्यातूनच चंद्राचा जन्म झाल्याचं म्हटलं जातं. असं असलं तरीही चंद्राच्या पृष्ठाच्या वयोमानाचा एकूण आकडा मात्र अद्यापही लक्षात आलेला नाही. कारण, प्रत्येक संशोधनातून एक वेगळी आकडेवारी समोर येत आहे. 


 हेसुद्धा वाचा : वेगानं फिरतोय 'मंगळ'; या लालबुंद ग्रहाचा वेग अचानक का वाढलाय?


चंद्राचा एक तुकडा 20 कोटी वर्षे जुना... 


चंद्राच्या वयाचा विषय निघताच संशोधक आणि अभ्यासकांनी अनेक निरीक्षणांच्या आधारे कयास लावला आहे. यूनिवर्सिटी ऑफ ओस्लोच्या सेंटर फॉर प्लॅनेटरी हॅबिटेबिलिटीमधील भूवैज्ञानिक स्टेफनी वॉर्नर यांनी एक वक्तव्य करत चंद्राचा एक भाग 20 कोटी वर्षे जुना असल्याचा अंदाज वर्तवला होता. आतापर्यंत अनेक संशोधकांनी अपोलो, लूना, चांग ई अशा अनेक मोहिमांच्या माध्यमातून चंद्राचं वय जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ज्याअंतर्गत चंद्रावरील माती, त्याच्या पृष्ठाचे नमुने निरीक्षणात सहभागी केले जेणेकरून त्याच्या वयाचा अंदाज लावता येईल. तूर्तास मारे इम्ब्रियन नावाचं चंद्रावरील एक क्षेत्र आतापर्यंतचं सर्वात जुनं क्षेत्र असल्याची बाब सध्यातरी समोर येत आहे. 


सध्याच्या घडीला चंद्राचं नेमकं वय किती? या प्रश्नाचं उत्तर कोणीही देऊ शकलं नसलं तरीही प्राथमिक स्तरावर लावले जाणारे अंदाज पाहता समोर आलेला आकडा थक्क करणारा आहे हे मात्र नक्की. तेव्हा आता भारताचं चांद्रयान 3 कधी एकदा चंद्रावर जातं आणि त्या वेगळ्या विश्वाची माहिती देतं याकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चांद्रयानानं चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्या क्षणापासून त्यानं चंद्राची काही छायाचित्रही पाठवली, ज्यामुळं कुतूहलाचा विषय ठरलेला हा चांदोमामा आपल्या आणखी जवळ आल्याचीच अनुभूती अनेकांना झाली.