Charlie Habdo Cartoon on Turkey: तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या भूकंपानंतर (Turkey Syria Earthquake) मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. दोन्ही देशांमध्ये झालेलं नुकसान पाहून संपूर्ण जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. मात्र दुसरीकडे फ्रान्समधील साप्ताहिक 'शार्ली हेब्दो'ने (Charlie Habdo Cartoon) एक कार्टून छापलं आहे, जे पाहिल्यानंतर लोक संताप व्यक्त करत आहेत. 'शार्ली हेब्दो'ने तुर्की भूकंपात मृत्यू झालेल्या लोकांची खिल्ली उडवली असल्याची टीका लोक करत आहेत. अनेक ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंतांनी हे कार्टून असंवेदनशील असून इस्लामोफोबियाग्रस्त (islamophobia) असल्याचं लक्षण असल्याचं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुर्की भूकंपानंतर 'शार्ली हेब्दो'ने 'Drawing of the day' नावाने एक कार्टून प्रसिद्ध केलं आहे. कार्टूनमध्ये भूकंपानंतर कोसळलेल्या इमारती आणि मलबा दाखवण्यात आला असून त्यावर 'तुर्कीत भूकंप' असं लिहिण्यात आलं आहे. कार्टूनच्या खाली लिहिण्यात आलं आहे की 'आता टँक पाठवण्याची गरज नाही'.


या व्यंगचित्रात तुर्की सैन्याने फुटीरतावादी कुर्दांच्या भागात रणगाडे पाठवण्यावर आणि मोर्टार शेलने परिसर उद्ध्वस्त करण्यावर उपहासात्मक भाष्य केलं आहे. तुर्की कुर्दांना फुटीरतावादी म्हणून मोठा धोका मानतो. या कुर्दबहुल भागाला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला आहे.



या कार्टूननंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. अनेकांनी हे कार्टून आपली विचारसरणी किती खालच्या पातळीची आहे हे दर्शवणारं असल्याचं म्हटलं आहे. हजारो निर्दोष पीडितांची खिल्ली उडवल्याने या कार्टूनविरोधात संताप आहे.


तुर्कीमधील पत्रकार सिरीन ओजनूर यांनी म्हटलं आहे की, "तुर्कीच्या लोकांनी कठीणप्रसंगी तुम्हाला सोबत दिली आहे आणि आज तुम्ही त्यांच्या वेदनेची खिल्ली उडवण्याची हिंमत करत आहात. लहान मुलं मलब्याखाली अडकलेली असताना, अशा प्रकारचं कार्टून प्रसिद्ध करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे".



7 जानेवारी 2015 रोजी शार्ली हेब्दोने पैगंबर मोहम्मद यांच्यासंबंधी वादग्रस्त कार्टून प्रसिद्ध केल्यानंतर त्यांच्या मुख्यालयावर हल्ला झाला होता. तेव्हा संपूर्ण जगाने या हल्ल्याचा निषेध केला होता. तुर्कीमधील लोकांनीही हल्ल्याचा निषेध करत शार्ली हेब्दोला पाठिंबा दर्शवला होता. पण आता जेव्हा तुर्कीमधील लोक संकटात आहेत तेव्हा शार्ली हेब्दो त्यांची खिल्ली उडवत आक्रोशात भर घालत आहे. 


तुर्की आणि सीरियात सोमवारी भूकंपामुळे मोठं नुकसान झालं. या भूकंपात आतापर्यंत 15 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही लोक मलब्याखाली अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. थंडी आण पावसामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत. बचावकार्य धीम्या गतीने सुरु असल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. ज्या लोकांना वाचवण्यात आलं आहे त्यांना थंडी आणि भुकेचा सामना कारावा लागत आहे. भारत, अमेरिका, जर्मनी अशा अनेक देशांनी तुर्कीला मदत पाठवली आहे.