मुंबई : कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीवरून चीनवर संशय घेतला जात आहे. त्यातच आता ५ देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी नवी माहिती समोर ठेवली आहे. कोरोना व्हायरसबाबत चीन खोटं बोललं असा दावा या ५ देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. कोरोना व्हायरसमुळे आत्तापर्यंत जगभरात २ लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५ देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी कोरोनाबाबत चीनच्या भूमिकेचा १५ पानांचा रिपोर्ट तयार केला आहे. या गुप्तचर यंत्रणांमध्ये अमेरिका, युके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या गुप्तचर यंत्रणांचा समावेश आहे. चीनने कोरोनाबाबत गुप्तता पाळणं हा जगाच्या पारदर्शकतेवर हल्ला असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.


काय आहे रिपोर्टमध्ये ?


'कोरोना व्हायरस माणसातून माणसात पसरतो, हे माहिती असतानाही चीनने २० जानेवारीपर्यंत हे मान्य केलं नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील हेच केलं. तायवानमधल्या काही अधिकाऱ्यांनी याबाबत ३१ डिसेंबरलाच तर ४ जानेवारीला हाँगकाँगने याबाबत प्रश्न उपस्थित केले होते.'


'कोरोना व्हायरसबाबत माहिती देणारे डॉक्टर गायब झाले. लॅबमध्ये पुरावे नष्ट करण्यात आले. कोरोनाची लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांना सॅम्पलही देण्यात आली नाहीत. वुहानमधले डॉक्टर ली वेनलियांग यांनी पहिल्यांदा या व्हायरसबाबत त्यांच्या शाळेतल्या मित्रांना वी चॅटच्या ग्रुपवर माहिती दिली. या मेसेजचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर ली वेनलियांग यांना अटक करण्यात आली.'


'चीनने स्वत:च्या नागरिकांच्या प्रवासावर बंधनं घातली, पण दुसऱ्या देशांवर अशी बंधनं घालण्याची गरज नसल्याचं चीनने सांगितलं. २३ जानेवारीला बिजिंगमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्याआधी वुहानमधून लाखो लोक बाहेर पडले. संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात अमेरिका, इटली, भारत, ऑस्ट्रेलिया आणि चीनच्या आजूबाजूच्या देशांनी प्रवासावर बंधनं घालण्याची गरज नसल्याचं चीनकडून सांगण्यात येत होतं. पण चीनने मात्र स्वत:च्या नागरिकांवर देशांतर्गत फिरण्यावर निर्बंध लादले होते.'


'चीनच्या प्रशासकांनी सार्स व्हेरियेशन, वुहान सीफूड मार्केट, वुहान अननोन न्यूमोनिया हे शब्द इंटरनेट सर्च इंजिनमधून हटवून टाकले होते. वुहानमधल्या शास्त्रज्ञांनी वटवाघळांना असलेल्या कोरोनावर संशोधन केलं,' अशी धक्कादायक माहिती या रिपोर्टमधून समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या द सॅडरडे टेलिग्राफ या वृत्तपत्रात ही माहिती आली आहे.


काही दिवसांपूर्वी युकेमधलं वृत्तपत्र असलेल्या डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, वुहानच्या लॅबोरेटरीमध्ये प्राण्यांवर संशोधन करण्यात आलं. यासाठी संशोधकांना अमेरिकन सरकारने ३.७ मिलियन निधी दिल्याचं सांगितलं जातंय. 


वुहानच्या लॅबोरेटरीमध्ये अपघात झाल्यानंतर कोरोना पसरला, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असं युके सरकारमधल्या सूत्रांनी सांगितल्याचं वृत्तही डेली मेलने दिलं होतं. 


वटवाघळांवर संशोधन करण्यासाठी अमेरिकेच्या युएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने अर्थसहाय्य केलं होतं. वुहान लॅबोरेटरीमध्ये कोरोना असलेली रक्त फवारणी झाल्यामुळे संशोधकांना कोरोना झाल्याचं बोललं जातंय, यानंतर लॅबजवळ असलेल्या स्थानिकांनाही त्याची लागण झाल्याची चर्चा आहे, असं डेली मेलचं वृत्त आहे.