बिजिंग: जगाला कोरोनाची भेट देणा-या चीनला पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा बसू लागला आहे. चीनमध्ये बीजिंगसह 15 मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळू लागले आहेत.ज्या वुहानमधून कोरोना जगभर पसरला त्याच चीनमध्ये आता पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे.चीनची राजधानी बीजिंगसह 15 शहरात नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यात डेल्टा व्हेरियंटची लागण झालेल्या रूग्णांचं प्रमाण अधिक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार जिआंग्सू प्रांताची राजधानी नानजिंग एअरपोर्टवरील काही कर्मचारी कोरोना संक्रमित झालेत.त्यानंतर तातडीनं अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली. नानजिंग, बीजिंग मध्ये कोरोना रूग्ण वाढत असल्यानं चिंता वाढली आहे. बीजिंग शहरात विमानांना थेट प्रवेशबंदी करण्यात आली आहे.



2.2 कोटी लोकसंख्येच्या बीजिंग शहरात नुकताच कम्युनिस्ट पार्टीचा शतक महोत्सव पार पडला. या शहरात राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांचं वास्तव्य आहे. बीजिंगमध्ये येणा-या बहुतांश आंतरराष्ट्रीय विमानांना आधी इतर शहरात उतरवण्यात येतं. बीजिंगमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांना 21 दिवस क्वारंटाईन राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. 


आतापर्यंत चीनमध्ये 40 टक्के लसीकरण झालं आहे. असं असलं तरी चीनमध्ये नव्यानं रूग्णवाढ होऊ लागल्यानं चिनी सरकार आणि प्रशासनासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण तो चीनमध्येच आढळला होता. त्यानंतर सर्वात आधी इथंच कोरोना आटोक्यात आला. पण आता चीनमध्ये पुन्हा कोरोना हातपाय पसरू लागला आहे. जगासाठी निश्चितच हे चांगले संकेत नाहीत.