Man Lifts Wife Tries To Flee From Court: चीनमध्ये एक फारच विचित्र प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी एका कोर्टात घटस्फोटाच्या प्रकरणावर सुनावणी सुरु असतानाच नवऱ्याने मागील 20 वर्षांपासूनच संसार मोडण्यास आणि पत्नीला घटस्फोट देण्यास नकार दिला. मात्र हा नकार देताना त्याने केलेली कृती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पत्नीला घटस्फोट द्यायचा नाही म्हणून या इसमाने चक्क आपल्या पत्नीला उचलून घेतलं आणि तो तिला कोर्टातून पळून गेला. पतीच पत्नीचा कोर्टरुममधून उचलून पळून गेल्याने त्यांच्या घटस्फोटावर पुढील सुनावणी न होताच पुढलं प्रकरण न्यायाधिशांनाही हाती घ्यावं लागलं.


पतीवर गंभीर आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या व्यक्तीने आपल्या पत्नीला उचलून कोर्टातून पळ काढला त्याचं नाव ली असं आहे. पत्नीला शिवीगाळ करण्याबरोबरच घरगुती हिंसाचाराचे आरोप ली वर ठेवण्यात आलेत. आपल्या पतीच्या या हिंसाचाराला कंटाळून चॅन अडनाव असलेल्या ली च्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. सुरुवातीला कोर्टाने ली आणि चॅन यांच्या घटस्फोटाची याचिका फेटाळली होती. या दोघांचं लग्न अजूनही टीकू शकतं असा विश्वास व्यक्त करत कोर्टाने याचिका फेटाळलेली. या दोघांमधील 'भावनिक नातं टिकून आहे' असं म्हणत कोर्टाने याचिका फेटाळल्याने या दोघांचा संसार सुरु होता. मात्र त्यानंतरही पतीचं विचित्र वागणं सुरु राहिल्याने चॅनने अखेर घटस्फोटासाठी अर्ज केला आणि पतीपासून वेगळं होण्यावर आपण ठाम असल्याचं कोर्टाला स्पष्टपणे सांगितलं.


आधीच केलेलं पळून जाण्याचं प्लॅनिंग


कोर्टाने दुसऱ्यांदा करण्यात आलेली याचिका स्वीकारली. सुनावणीसाठी हे दोघेही कोर्ट रुममध्ये गेले तेव्हाच ली ने पत्नीला उचलून पळून जाण्याचा प्लॅन आखला होता. सुनावणी सुरु होणार इतक्यात ली ने पत्नीला आपल्या पाठीवर उचललं आणि तो कोर्टरुममधून बाहेर पळाला. कोर्टाच्या आवारातून बाहेर पळून गेला. पत्नीला पाठीवर घेऊन कोर्टातून बाहेर पळून जाताना ली मोठमोठ्याने ओरडत होता अशी माहिती समोर आली आहे. 


कोर्टाने संतापून दिले हे आदेश


या साऱ्या प्रकारावर कोर्टाने संताप व्यक्त केला आहे. ली ने जे काही कृत्य केलं तो कोर्टाचा अवमान असून त्याने कोर्टाची लेखी माफी मागावी असे आदेश देण्यात आले. तसेच अशापद्धतीचं कृत्य आपण पुन्हा करणार नाही हे ली ने लेखी द्यावं असं कोर्टाने सांगितलं. "मला आता मी केलेल्या चुकीचं गांभीर्य लक्षात आलं आहे. तसेच त्याचा कशापद्धतीने नकारात्मक परिणाम झाला हे ही मला उमगलं आहे. मी तुम्हाला आश्वासन देतो की मी पुन्हा अशापद्धतीची चूक भविष्यात करणार नाही," असा मजकूर असलेलं पत्र ली ने कोर्टाला दिल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.