नवी दिल्ली : लडाखला केंद्रशासीत प्रदेश करण्याच्या भारताच्या निर्णयाला चीनने विरोध दर्शवला आहे. अरूणाचलप्रदेशालाही भारताचे राज्य म्हणून मान्यता देण्यास चीनने विरोध दर्शवला आहे. चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी काल पत्रकार परिषदेत हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच भारताने दोन दिवसांपूर्वी उद्घाटन केलेल्या ४४ पुलांमुळे चीन नाराज झाला आहे. भारत सीमाप्रदेशात वेगाने पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. हेच नेमके आत्ताच्या संघर्षाचं मूळ आहे असे लिजिआन यांनी म्हटले आहे. 


दरम्यान, भारत आणि चीन यांच्यातल्या सातव्या फेरीची चर्चा सकारात्मक होती, असे दोन्ही लष्करांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आली आहे. मात्र अजूनही सैन्यमाघारीबाबत वेगवान हालचाली होण्यावर मात्र काही घोषणा झालेली नाही. 


मतभेदांचे रूपांतर संघर्षात होऊ नये या मुद्द्यांवर दोन्ही कोअर कमांडर्समध्ये सहमती झाली. मात्र अजूनही महत्त्वाच्या संघर्षाच्या ठिकाणी दोन्ही लष्करं आमने सामने बसून आहेत. लष्करी आणि राजनैतिक चर्चेतून संघर्ष निवळण्याचा तोडगा लवकरात लवकर निघावा यावर चर्चेत सहमती झाली आहे.