चीनने वाढवली जगाची चिंता; वुहानमध्ये पुन्हा वाढतायत रूग्ण
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणं वाढू लागली आहेत.
मुंबई : चीनमधून कोरोनासारख्या गंभीर व्हायरसने जगभरात पसरण्यास सुरुवात झाली. यानंतर संपूर्ण जगाला याचा फटका बसला. या व्हायरसमुळे जगभरात अनेक मृत्यू झाले. तर आता पुन्हा एकदा चीनने सर्व जगाला चिंतेत टाकलंय. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणं वाढू लागली आहेत. यामुळे त्याठिकाणी मास टेस्टिंग सुरु केलं आहे.
शनिवारी स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की वुहानच्या 1.2 कोटी लोकसंख्येपैकी 1.1 कोटी लोकसंख्येच्या कोविड चाचण्या झाल्या आहेत. म्हणजेच तिथल्या तब्बल 90 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
वुहानमध्ये 6 नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. यासह, अशी 15 प्रकरणे देखील नोंदवली गेली आहेत, ज्यात कोणतीही लक्षणं नाही. हुबेई प्रांतात शुक्रवारपर्यंत 47 प्रकरणांची पुष्टी करण्यात आली आहे. यापैकी 31 प्रकरणे स्थानिक पातळीवर संक्रमित आहेत. सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 64 लक्षणे नसलेल्या रुग्णांना वुहानमधील डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
हुबेई प्रांताच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे उपसंचालक ली यांग यांनी सांगितलं की, शहरात 4 ऑगस्टपासून मास टेस्टिंगला सुरुवात कऱण्यात आल्या होत्या. आतापर्यंत 1.08 कोटीहून अधिक लोकांचे निकालही आले आहेत. यांच्या रिपोर्टसची तपासणी व्यस्त आहेत. शिन्हुआच्या अहवालानुसार, शहरातील 157 निवासी समुदाय शुक्रवारपर्यंत बंद करण्यात आले आहेत.
चीनच्या आरोग्य आयोगाने सांगितले की, शुक्रवारी देशात कोविडचे 139 नवीन रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारपर्यंत चीनमध्ये कोरोनाची 93,605 प्रकरणं नोंदवली गेलीआणि 4,636 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1,444 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 39 रुग्ण असे आहेत ज्यांची प्रकृती गंभीर आहे.