`..तर आर्थिक युद्धाला तयार रहा`; चीनचा अमेरिकेला इशारा
काही तांत्रिक चाचण्यांच्या चोरी प्रकरणी चौकशी करण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोहीम आखली होती.
बीजींग : आपल्या अडेलतट्टूपणामुळे भारताची डोकेदुखी होऊन बसलेल्या चीनने महासत्ता अमेरिकेलाही इशारा दिला आहे. आमच्याबद्धलची चौकशी कामय ठेवाल तर, मोठ्या आर्थिक युद्धासाठी तयार रहा, असे चीनने अमेरिकेला म्हटले आहे. काही तांत्रिक चाचण्यांच्या चोरी प्रकरणी चौकशी करण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोहीम आखली होती. अर्थातच अमेरिकेचा रोख चीनकडे होता. हे ओळखून चीनने अमेरिकेला इशारा दिला आहे.
आपल्याविरूद्ध चौकशी करण्याची मोहीम कायम ठेवाल तर, भविष्यात आर्थिक युद्ध सुरू होऊ शकते, असे चीनने म्हटले आहे. चीनच्या अर्थमंत्रालयात 'थिंक टॅंक' टीममध्ये काम करणाऱ्या एका अभ्यासकाने 'चायना डेली' या वृत्तपत्रात लेख लिहीला आहे. या लेखातच अमेरिकेला हा इशारा देण्यात आला आहे. चायना डेलीतील वृत्तात, तांत्रिक चाचण्यांच्या चौकशीचा ट्रम्प यांनी घेतलेला संभाव्य निर्णय हा, खासकरून बैद्धीक संपदा (कॉपीराईट) क्षेत्रात तणाव वाढवणारा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, ट्रम्प याबाबत सोमवारी भूमिका जाहीर करतील.
ट्रम्प प्रशासनातील एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रीयेत म्हटले आहे की, राष्ट्रपती ट्रम्प आपल्या व्यापार कार्यालयाला हे निश्चित करण्याचे आदेश देतील की, अमेरिकी तांत्रिकी तसेच, बौद्धिक संपदेची चीनकडून होत असलेल्या संभवीत चोरी प्रकरणी 1975 च्या व्यापार करारानुसार चौकशी सुरू करावी किंवा नाही. दरम्यान, चीनकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रीया आली नसल्याचे अधिकाऱ्याने म्हटले होते.