Job News : आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्येच नोकरी मिळाली, तर तिथं काम करण्याची मजा काही औरच असते. पण, अनेकदा क्षेत्र आणि नोकरी सुरुवातीला आवडीची वाटत असली तरीही एका टप्प्यानंतर गोष्टी स्थिरस्थावर झाल्याचं लक्षात येतं. अनेकदा प्रगतीचा गाडा पुढेच जात नाहीय असंही अनेकांना जाणवतं, यातूनच कामाची टाळाटाळ, नोकरीच्या ठिकाणी सतत असह्य वाटून घेणं, तब्येतीच्या तक्रारी करणं, किंवा मानसिक खच्चीकरण होईल अशाच गोष्टींचा सातत्यानं विचार करणं अशीच परिस्थिती निर्माण होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्ली कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये अशा अनेक कर्मचाऱ्यांची हीच स्थिती आहे. कंपनीकडून मिळणारी आठवडी सुट्टीसुद्धा कर्मचाऱ्यांना आनंद देऊन जात नाही, यातूनच कर्मचाऱ्यांच्या कामावर आणि सरतेशेवटी कंपनीच्या एकूण कामगिरीवरही थेट परिणाम होतो. हीच बाब लक्षात घेत कर्मचाऱ्यांचा आनंद, त्यांचं हित केंद्रस्थानी ठेवत एका कंपनीनं कर्मचाऱ्यांना थेट (Unhappy Leave) 'अनहॅपी लिव्ह' देण्याची तरतूद केली आहे. शब्दाप्रमाणंच ही सुट्टी देण्यामागं तसंच कारण आहे. 


चीनमधील एका व्यावसायिकानं त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 'अनहॅपी लिव्ह'ची घोषणा केली असून, त्यानुसार तर एखादा कर्मचारी आनंदी नसेल, हताश असेल तर त्याला कामावरुन रजा घेता येईल. या योजनेनुसार नोकरीच्या ठिकाणी आनंदी वाटत नसेल, काही कारणानं कर्मचारी दु:खी असेल तर त्या कर्मचाऱ्यांनी सुट्टी घेत स्वत:ला कामापासून दूर ठेवावं हे इतकं सोपं समीकरण. 


हेसुद्धा वाचा : लहानपणापासून मित्र, 15 वर्षांचं रिलेशन अन् आता लग्न... 'हा' उद्योगपती होणार अभिनेत्रीचा पती


 


पँग डोंग लाय (Pang Dong Lai) असं या न मागताच सुट्टी जाहीर करणाऱ्या कंपनीचं नाव असून, या कंपनीचे मालक आहेत यू डोंगलाय (Yu Donglai). त्यांच्या मते कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विश्रांतीसाठीचे पर्याय स्वत: ठरवावेत आणि कंपन्यांनीसुद्धा या पर्यायांना प्रोत्साहन द्यावं. असं केल्यानं कर्मचाऱ्यांना मानसिक स्थैर्य मिळून त्यांचं मनोबल वाढण्यासमवेत त्यांच्या कामावर आणि पर्यायी कंपनीच्या उत्पादकतेवर याचा सकारात्मक परिणाम होईल. कर्मचारीसुद्धा या अशा पर्यायांमुळं नोकरी आणि खासगी जीवनात सहज समतोल राखत त्यांच्या कार्यपद्धतीतही सुधारणा करतील हाच यामागचा हेतू. 



काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या चायना सुपरमार्केट वीकदरम्यान, यू डोंगलाय यांनी ही घोषणा केली. कंपनीतील कर्मचाऱ्यांची मानसिक आणि भावनिक स्थिती काम करण्याजोगी नसेल, तेव्हातेव्हा हे कर्मचारी या रजेसाठी पात्र असतील असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.