प्रेमासाठी तरुणींना या कंपन्यांकडून मिळतेय `डेटिंग लीव्ह`
कंपन्यांनी आपला हा निर्णय सोशल मीडियावरून शेअर केल्यानंतर या निर्णयाचं कर्मचारी वर्गाकडून कौतुक केलं जातंय
नवी दिल्ली : जोडीदारावर प्रेम करण्यासाठी तुमच्या कंपनीकडून तुम्हाला 'डेटिंग लिव्ह' मिळाली तर... कल्पनाही सुखावून जातेय ना... पण ही कल्पना दोन चीनी कंपन्यांनी अस्तित्वात आणलीय. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 'डेटिंग लीव्ह' मिळणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, महिला जास्तीत जास्त वेळ डेस्कवर कामात व्यस्त असल्याकारणानं कंपनीनं हा निर्णय घेतलाय. जास्तीत जास्त वेळ आपल्या कामाला दिल्यानंतर महिलांकडे आपल्या कुटुंबाला आणि खास करून आपल्या जोडीदाराला देण्यासाठी वेळच उरत नाही... त्यामुळे त्यांचं आपल्या खाजगी जीवनाकडे दुर्लक्ष होतं. हे असं होऊ नये, अशी कंपनीचीही इच्छा असल्यानं महिलांसाठी 'डेटिंग लीव्ह'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. त्यामुळे आता या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना सुट्टीसाठी खोटी कारणं शोधण्याचीही गरज उरणार नाही.
या दोन्ही कंपन्या चीनच्या झेजियांग प्रांतात स्थित आहेत. कंपन्यांनी आपला हा निर्णय सोशल मीडियावरून शेअर केल्यानंतर या निर्णयाचं कर्मचारी वर्गाकडून कौतुक केलं जातंय. आता अनेक महिला पुरुषांसोबत किंवा आपल्या जोडीदारासोबत वेळ व्यतीत करू शकतील, असं इथल्या कर्मचाऱ्यांना वाटतंय.
या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना एका वर्षात आठ डेटिंग लीव्ह घेता येणार आहेत. परंतु, कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या या सुट्ट्यांचा फायदा सर्वच वयातील महिलांना मात्र मिळू शकणार नाही. केवळ २० ते ३० वर्ष वयोगटाच्या महिला 'डेटिंग लीव्ह' घेऊ शकतील.
यापूर्वी, चीनच्या याच शहरातील एका शाळेनं महिला शिक्षकांसाठी प्रत्येक महिन्याला दोन हाफ डे देण्याचा निर्णय घेतला होता. शाळेनं या सुविधेला 'लव्ह लीव्ह' असं नाव दिलं होतं.