लडाख : पूर्व लडाखमध्ये तैनात असलेल्या चिनी सैनिकांची प्रकृती थंडीमुळे गंभीर बनत चालली आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीने थंडीमुळे 90 टक्के सैनिकांना माघारी बोलवलं आहे. मागील वर्षी एप्रिल-मेपासून चीनने पूर्व लडाखमध्ये 50 हजाराहून अधिक सैन्याला भारतीय सीमेजवळ तैनात केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी एएनआयला सांगितले की, 'गेल्या एक वर्षापासून तेथे उपस्थित असलेल्या सैनिकांची जागा घेण्यासाठी चीनने दुसऱ्या सैनिकांना बोलावलं आहे. सुमारे 90 टक्के सैनिक मागारी बोलवण्यात आले आहेत. थंडीमुळे या भागात भीषण परिस्थितीत तैनात केलेल्या चिनी सैन्यांवर मोठा परिणाम झाला आहे. सूत्रांनी सांगितले की, पँगाँग लेक क्षेत्रात तैनात चिनी सैनिकांची हालचाल प्रतिबंधित झाली होती. रोज सैनिकांना हलवण्यात येत होते.


भारतीय सैन्य दोन वर्षासाठी आपल्या सैनिकांना या उंच भागात तैनात करते आणि दर वर्षी सुमारे 40-50 टक्के सैनिक फिरवले जातात. अशा परिस्थितीत आयटीबीपी कर्मचार्‍यांचा कार्यकाळ कधीकधी दोन वर्षांपेक्षा जास्त असतो. मागील वर्षी एप्रिल-मेपासून भारत आणि चीनने पूर्व लडाख आणि नियंत्रण रेषेच्या जवळ एकमेकांच्या समोर प्रचंड सैन्य तैनात केले होते. या वर्षाच्या सुरूवातीस, दोन्ही देशांनी पँगाँग लेक क्षेत्रात आपले तैनात सैन्य मागे घेण्याचे आणि तेथील गस्त थांबविण्याचे मान्य केले होते. तरी देखील सैनिक जवळच्या भागात आहेत.


भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे वारंवार लडाख सेक्टरला भेट देत आहेत आणि परिस्थितीशी सामोरे जाण्यासाठी सैन्याला मार्गदर्शन करत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह चायना स्टडी ग्रुपही परिस्थितीशी सामोरे जाण्यासाठी सल्ला देत आहे आणि चीनशी चर्चेदरम्यान सूचनाही देत ​​आहे.