Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओत लोक ट्रेनमधून बाहेर पडण्यासाठी खिडकीच्या काचा फोडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ लंडनमधील (London) असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे. व्हिडीओत रेल्वे स्थानकावर प्रवाशांची आरडाओरड, धावपळ सुरु असल्याचं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये फायर अलार्म वाजला होता. यावेळी प्रवासी ट्रेनमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होते. पण ट्रेनचे दरवाजे उघडले जात नव्हते. यामुळे प्रवाशांवर खिडकीच्या काचा फोडण्याची वेळ आली. व्हिडीओमध्ये एकीकडे ट्रेनच्या आतमधील प्रवासी काच फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न करताना दिसत असताना, दुसरीकडे स्थानकावर उभे प्रवासीदेखील त्यांची मदत करताना दिसत आहेत. 


स्थानकावर उभे प्रवासी हातातील जड वस्तू काचेवर मारत ती फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच दरवाजे उघडत नसल्याने काही प्रवासी जोर लावत ते उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचंही दिसत आहे. व्हिडीओत लोक आपला जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत असून, धावपळ करताना दिसत आहे. 


दरम्यान, या घटनेनंतर ट्रान्सपोर्ट फॉर लंडनकडून सार्वजनिकपणे जाहीर माफी मागण्यात आली आहे. तसंच अग्निशमन दलाला तैनात केलं जाणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेनंतर नाराजी जाहीर केली आहे. इतकी मोठी दुर्घटना झालेली असताना दरवाजे का उघडले नाहीत अशी विचारणा त्यांनी केली आहे. 



ट्विटरला जेक शार्प नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की "संपूर्ण ट्रेन धुराने भरलेली असतानाही दरवाजे उघडले जात नाहीत. स्टेशन कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी योग्य प्रतिक्रिया दिलेली नाही. ट्रान्सपोर्ट फॉर लंडन, तुम्हाला लाज वाटली पाहिजे".


ट्रान्सपोर्ट फॉर लंडनने यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, अग्निशमन दलाला तिथे आग लागली नव्हती अशी माहिती मिळाली आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. 


दरम्यान, या व्हिडीओला 30 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तसंच त्यावर अनेकजण कमेंट करत आहेत. आग लागली नाही याचा अर्थ दरवाजे उघडणार नाहीत असा नाही. सर्व लोक आपातकालीन खिडकीतून बाहेर पडू शकत नाहीत असं एका युजरने म्हटलं आहे. तर एका युजरने अनेक लोक मदत करण्याऐवजी व्हिडीओ काढत आहेत अशी टीका केली आहे.