मुंबई  : कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वच देश युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. तरी देखील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आणि मृतांच्या आकड्यात मात्र काही फरक जाणवत नाही. त्यात दिलासादायक बाब म्हणजे या आजारातून सुखरूप बाहेर येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. संपूर्ण जगात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १९ लाखांच्या वर गेला. त्यामुळे सर्वच स्तरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने मंगळवारी ही माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या प्रणाली विज्ञान व अभियांत्रिकी केंद्राने (सीएसएसई) कोरोनाग्रस्तांचे नवीन आकडे जारी करत सांगितले की,  मंगळवारी सकाळपर्यंत जागतिक स्तरावर या धोकादायक आजाराची लागण झालेल्या एकूण लोकांची संख्या १९ लाख २० हजार ६१८ ऐवढी होती, तर मृतांची संख्या १ लाख १९ हजार ६८६ ऐवढी होती. शिवाय परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर हा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. 


दरम्यान, संपूर्ण जगात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेत आहे.  याठिकाणी ५ लाख ८२ हजार ५८० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २३ हजार ६२२ नागरिकांनी आपले प्राण गमावले आहे. या महामारीचा फटका चीननंतर अमेरिकेला बसला आहे. 


तर दुसऱ्या स्थानी स्पेन आहे. याठिकाणी १ लाख ७० हजार ९९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. १७ हजार ७५६ नागरिकांनी आपले प्राण गमावले आहे. तर तिसऱ्या स्थानी इटली आहे. इटलीमध्ये १ लाख ५९ हजार ५२६ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून २० हजार ४६५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 


कोरोनाचा अधिक फैलाव झालेल्या देशांच्या चौथ्या स्थानी फ्रान्स आहे. फ्रान्समध्ये १ लाख ३७ हजार ८७७ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जर्मनी याबाबतीत पाचव्या स्थानावर आहे. या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ३० हजार ७२ ऐवढी आहे.