नवी दिल्ली : वादग्रस्त इस्लाम प्रचारक झाकिर नाईक (Zakir Naik) याच्या प्रयत्नांना मालदीव सरकारनं खो घातलाय. झाकिरला मालदीवमध्ये जाण्याची इच्छा होती परंतु, इथल्या सरकारनं मात्र झाकिर नाईकला आपल्या देशात प्रवेश करण्याची परवानगी नाकारलीय. मालदीव संसदेचे अध्यक्ष एम नशीद यांनी न्यूज एजन्सी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, झाकिर नाईकला मालदीवमध्ये शरण मिळणार नाही. '२००९ साली आम्ही झाकिर नाईकला आमच्या देशात प्रवेश करण्याची परवानगी दिली होती. कारण त्यावेळी कोणताही वाद समोर आला नव्हता. त्यानंतर त्यानं नुकताच पुन्हा एकदा व्हिजा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, सरकारनं त्याला व्हिजा आणि देशात प्रवेश नाकारला. इस्लाममधल्या चांगल्या गोष्टींचा प्रसार करणाऱ्या प्रचारकांना आम्ही जवळ करू शकतो परंतु, तिरस्काराचा प्रसार करणाऱ्यांना परवानगी देऊ शकत नाही' असं नशीद यांनी स्पष्ट केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादग्रस्त 'पीस टीव्ही'चा संस्थापक असलेल्या ५३ वर्षीय झाकिर नाईकचा जन्म मुंबईतला... जुलै २०१६ मध्ये दहशतवादी हल्ल्यात जाकिर नाईक याचं नाव समोर आल्यानंतर त्यानं भारतातून पळ काढला. झाकिर नाईकला भारतानं 'वॉन्टेड' म्हणून घोषित करून त्याच्या 'इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन'वर बंदी घातली.



झाकिर नाईकनं सध्या मलेशियामध्ये आश्रय घेतलाय. मलेशियाच्या पूर्वीच्या सरकारनं नाईकला स्थायी रहिवासी केलंय. त्यानंतर, सद्य सरकारनं त्याला भारताच्या हवाली करण्याचा निर्णय घेतला नसला तरी त्याच्यावर सार्वजनिक भाषण देण्याची बंदी घातलीय.