मुंबई : अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाची नवी लाट आलीय. 1 लाखाहून अधिक लोकांना एकाच दिवशी डेल्टा वेरियंटचा संसर्ग झाल्यानं अमेरिकेत खळबळ उडाली आहे. गेल्या चोवीस तासात अमेरिकेत 1,06,084 नवे कोरोना रुग्ण आढळले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात नव्या रुग्णांची संख्या 73 टक्क्यांनी वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णवाढीची सरासरी 62,411 इतकी होती. तर गेल्या महिन्यातील ही आकडेवारी केवळ 12,648 इतकी होती. मात्र या आठवड्यात एकाच दिवसात 1 लाखापेक्षा जास्त रुग्ण सापडल्याने अमेरिकेचे टेन्शन वाढलं आहे.


यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू झालीय. हाय रिस्क असलेल्या भागांमध्ये मास्कचा वापर सक्तीचा करण्यात आलाय. सध्या दोन डोस घेतलेले नागरिक मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी हिंडू-फिरू शकत होते. मात्र यापुढे लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनीही मास्कचा वापर केला पाहिजे, असा नियम अमेरिकेतल्या रोग प्रतिबंधक विभागानं अर्थात सीडीसीनं जारी केला आहे.



कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना मास्क लावण्याची गरज भासणार नाही, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा सीडीसीनं मास्क वापरण्याचा सल्ला अमेरिकन नागरिकांना दिलाय. विशेषतः शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालकांना मास्क वापरावा, असं सीडीसीनं म्हटलंय.


अमेरिकेत जे घडतंय, ते पाहता भारतानं आतापासूनच सावध व्हायची गरज आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण आणि मास्कचा वापर याबाबत भारतीय नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यायला हवी.