अमेरिकेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर, रुग्ण संख्येत मोठी वाढ
अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा मोठी वाढ
नवी दिल्ली : कोरोना साथीच्या दुसर्या लाटेशी झुंज देणार्या अमेरिकेतील संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या देशात 27 तारखेला एक लाखाहून अधिक नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 1 लाख 43 हजाराहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमितांची संख्या 1 कोटी 31 लाख 42 हजारांहून अधिक झाली. आतापर्यंत 2 लाख 65 हजाराहून अधिक बळी गेले आहेत.
अमेरिकेच्या रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राने रविवारी माहिती दिली की, देशात 1 लाख 43 हजार 333 नवीन पॉझिटिव्ह प्रकरणे आढळली आहेत. तर जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत कोरोनावर मात करणाऱ्या लोकांची संख्या 50 लाखावर गेली आहे. दरम्यान, न्यूयॉर्कचे महापौर बिल डी ब्लासिओ यांनी 7 डिसेंबरपासून शहरातील शाळा सुरू करण्याची घोषणा केली. जगातील कोरोना साथीच्या आजाराचा सर्वाधिक परिणाम अमेरिकेत दिसतो आहे. या देशात सर्वाधिक संसर्ग टेक्सासमध्ये झाला आहे. आतापर्यंत या प्रांतात दीड लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. कॅलिफोर्नियामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 12 लाखाहून अधिक आहे. फ्लोरिडामध्ये सुमारे दहा लाख प्रकरणं पुढे आली आहेत.
ब्राझील : 24 हजाराहून अधिक नवीन रुग्णांची वाढ झाली असून संक्रमित लोकांची संख्या 63 लाखांवर गेली आहे. आतापर्यंत एक लाख 72 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
रशिया : 26 हजार 338 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून एकूण संक्रमितांची संख्या 23 लाखांवर गेली आहे. आतापर्यंत 39 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मेक्सिको : देशात 6,388 नवे कोरोना रूग्णांची वाढ झाली असून एकूण संक्रमितांची संख्या 11 लाखावर गेली आहे. आतापर्यंत एक लाख पाच हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.