१८६ देशांमध्ये कोरोनाची लागण, ११,८३० जणांचा बळी
भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
मुंबई : भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३२१ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्वाधिक ६४ रुग्ण आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. भारतामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यातला एक रुग्ण कर्नाटकच्या कलबुर्गीचा, दुसरा रुग्ण दिल्लीचा आणि तिसरा रुग्ण मुंबईचा आहे. मृत्यू झालेले तिन्ही रुग्ण वयोवृद्ध होते.
जगभरामध्ये कोरोना व्हायरसचे २,८६,००० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे ११,८३० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या बाहेर कोरोनाचे २,०५,००० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. १८६ देशांमध्ये कोरोना पोहोचला आहे.
एकट्या इटलीमध्ये कोरोनामुळे ४,०३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इराणमध्ये १,५५६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामधून ३२.७० टक्के लोकं आतापर्यंत बरे झाले आहेत.