इटली : कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण इटली देशच लॉकडाऊन करण्यात आलाय. इटलीच्या संपूर्ण ६ कोटी लोकसंख्येचा जगापासून संपर्क तोडण्यात आलाय. एक संपूर्ण देश लॉकडाऊन होण्याची ही पहिलीच घटना आहे. चीननंतर इटलीत कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक झालाय. आतापर्यंत ९ हजार १७२ केसेस पॉझिटीव्ह आढळल्या असून मृतांचा आकडा ४६३ पर्यंत गेलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे इटली सरकारनं कडक उपाययोजना केल्यात. सध्या ३ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. अत्यंत महत्त्वाचं काम किंवा मेडिकल इमर्जन्सी असल्याखेरीज कुणालाही देश सोडता येणार नाही, तसंच रास्त कारण असल्याखेरीज कुणालाही इटलीमध्ये प्रवेश करता येणार नाही.


सर्व शाळा, कॉलेज आणि विद्यापीठं बंद ठेवण्यात येणार आहेत. सर्व रेस्टराँ आणि बार स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता बंद करण्यात येतील.



भारतीयांची सुटका 


कोरोना व्हायरसमुळे मागचे कित्येक दिवस इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची आज सुटका करण्यात आलीय. इराणमधून ५८ भारतीयांच्या पहिल्या बॅचला घेऊन हवाई दलाचं सी १७ ग्लोबमास्टर विमान सकाळी भारतात परतलं. गाजियाबादमधल्या हिंडन एअरबेसवर हे विमान दाखल झालं. यातून आलेल्या सर्व ५८ भारतीयांची कसून वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. 


त्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना व्हायरसरहित आल्यावरतीच, त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे पाठवलं जाणार आहे. इराणमध्येही कोरोनाचा फैलाव झालाय. इथं कोरोनाबाधितांची संख्या ७ हजार १६१ वर पोहोचलीय. तर आतापर्यंत इराणमध्ये कोरोनामुळे २३७ जणांचा मृत्यू झालाय.