`कोरोना`शी झुंजणाऱ्या वयोवृद्ध जोडप्याचा `गुडबाय` व्हिडिओ व्हायरल
`एकमेकांना भेटण्याचा त्यांचा हा कदाचित अखेरचा क्षण ठरू शकतो`
नवी दिल्ली : चीनमध्ये अत्यंत वेगानं फैलावलेल्या कोरोना व्हायरसनं आत्तापर्यंत अनेकांचे प्राण घेतलेत. या व्हायरसच्या विळख्यात अनेक लहान मुलं, महिला, तरुण आणि वयोवृद्धही सापडलेत. अशाच एका वयोवृद्ध जोडप्याच्या व्हिडिओनं अनेकांच्या डोळ्यात पाणी उभं केलंय. हे जोडपं कोरोना व्हायरसला लढा देतंय. त्यांचा अखेरचा 'गुडबाय' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
कोरोना व्हायरसनं आत्तापर्यंत जगभरात जवळपास ४५० जणांचे प्राण घेतलेत. यातच चीनच्या एका वयोवृद्ध जोडप्याचा एक भावूक व्हिडिओ समोर आलाय. कोरोना व्हायरसची भीषणता व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा ठरतोय.
व्हिडिओत, जवळपास वयाच्या ८० व्या वर्षांत असलेले पती-पत्नी एकमेकांना गुडबाय करताना दिसत आहेत. हे दोघेही रुग्णालयाच्या बेडवर एकमेकांचा निरोप घेताना दिसत आहेत. हा भावूक करणारा क्षण इंटरनेटवर पाहून अनेक जण हळहळताना दिसत आहेत.
एका ट्विटर युझरनं हा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केलाय. 'एका दाम्पत्याचा अर्थ? ८० व्या वर्षात असलेले दोन कोरोना व्हायरसचे रुग्ण आयसीयूमध्ये एकमेकांना गुडबाय म्हणत आहे... एकमेकांना भेटण्याचा त्यांचा हा कदाचित अखेरचा क्षण ठरू शकतो' असं कॅप्शन या व्यक्तीनं व्हिडिओला दिलंय.
त्यानंतर थोड्यात वेळात हा व्हिडिओ व्हायरल झाला. 'वयोवृद्ध जोडप्याला अशा कठीण परिस्थितीत पाहणं त्रासदायक आहे' अशी प्रतिक्रिया एका युझरनं दिलीय. तर एकानं हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल आभार मानलेत. तर आणखी एका युझरनं या वयोवृद्ध जोडप्याच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केलीय.