जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : पोलिओ, निमोनिया, बीसीजी, रूबेला, मीजल्स, मंप्स यासारख्या आजाराच्या प्रभावी लसी भारतात बनवल्या जातात. भारतात महत्त्वाच्या लस बनवणाऱ्या सहापेक्षा जास्त कंपन्या आहेत. याशिवाय काही लहान कंपन्याही भारतात लस बनवण्यात मागे नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड-१९ ला कायमचं संपवण्यासाठी भारताच्या अर्धा डझनपेक्षा जास्त कंपन्या, लस बनवण्यावर लक्ष केंद्रीत करून आहेत. जगातील सर्वात मोठी लस बनवणारी कंपनी भारतात आहे. 


लसीचे डोस आणि जगभरात प्रभावी लस पोहोचवण्यात ही कंपनी आघाडीवर आहे. यामुळे पुण्यातील सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया सध्या चर्चेत आहे.पुण्यातल्या या कंपनीच्या स्थापनेला ५० पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. 


पुण्यातील या कंपनीचे दोन प्लांट आहेत जे महत्त्वाचे मानले जातात. या कंपनीचे दोन युनीट इतर देशात आहेत. ही कंपनी १६५ देशात २० प्रकारच्या लसी पुरवते. विशेष म्हणजे ही कंपनी जेवढ्या लस बनवते, त्यापैकी ८० टक्के लस निर्यात होतात. 


साधारण सरासरी ५० ते १०० रूपयांच्या आत ही लस असते. यामुळे जगभरात सर्वात स्वस्त लस पुरवणारी ही कंपनी आहे. आता कोडाजेनिक्स आणि सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया या कंपनीने कोरोनावर लस शोधणे आणि निर्मितीसाठी सोबत काम सुरू केलं आहे. कोडाजेनिक्स ही एक अमेरिकन बायोटेक कंपनी आहे. 


भारत आणि अमेरिका मागील ३० पेक्षा जास्त वर्षांपासून लस शोधण्याचा संयुक्त कार्यक्रम चालवत आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर याला मान्यता प्राप्त आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोन्पिओ यांनी, भारत आणि अमेरिका संयुक्तपणे कोरोनावर लस विकसित करू शकतात असं म्हटलं होतं.


 भारत लसीचं संशोधन आणि लस निर्मितीच्या बाबतीत आघाडीवर असणारा देश आहे. जगभरात सर्वात जास्त लसी भारतात बनवल्या जातात. आता 'लाईव्ह एटेनुएटेड लस' बनवली जाणार आहे. 


'लाईव्ह एटेनुएटेड' अशी लस आहे. ज्या प्रक्रियेत अशी लस शोधली जाते, ज्यात व्हायरसला कमजोर करून लॅबमध्ये वॅक्सिन तयार करण्यासाठी वापरलं जातं. हा व्हायरस जिवंत असतो, पण प्रयोगशाळेत यावर प्रचंड नियंत्रण असतं.


सीरम इन्स्टीट्यूड ऑफ इंडियाचे सीईओ आधार पुनावाला यांनी लसीचं संशोधन, वापर यावर महत्त्वाची माहिती दिली आहे. पुनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसीचा प्रयोग एप्रिल महिन्याच्या शेवटी जनावरांवर केला जाणार आहे, यानंतर सप्टेंबरपर्यंत आम्ही माणसांवर हा प्रयोग करू.


 पुनावाला यांच्या कंपनीने, इंग्लंड सरकारच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी देखील करार केला आहे. 'हा करार ऑक्सफर्डकडून विकसित केल्या जाणाऱ्या एका लसीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी आहे.तसेच लस यशस्वी ठरली तर सप्टेंबर महिन्यात १० लाख डोस तयार करू.'