नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं चित्र आहे. अशातच आता केवळ सामान्य नागरिकच नाही तर, आरोग्य मंत्र्यालाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. इंग्लंडच्या आरोग्य मंत्री नदीन डॉरिस यांनादेखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. संपूर्ण देशात संसर्ग रोखण्यासाठी काम करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांलाच कोरोनाची लागण झाल्याने यासंबंधी अधिक तपास सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटीश खासदार आणि आरोग्य विभाग मंत्री नदीन डॉरिस यांनी एक निवेदन जाहीर करत, त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या टेस्ट रिपोर्टमध्ये कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचं दाखवण्यात आलं आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर ६२ वर्षीय आरोग्य मंत्र्यांनी आपल्या घरात स्वत:ला वेगळं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.



कोरोना व्हायरसच्या संक्रमणावर ब्रिटीश सरकार तातडीने काम करत आहे. सर्व सुरक्षा उपायांचा वापर करण्यात येत आहे. परंतु, आरोग्यमंत्र्यांनाच कोरोनाची लागण होणं, तपासाचा विषय ठरत आहे. आरोग्य विभागाकडून याबाबत अधिक तपास सुरु आहे. 


इंग्लंडच्या आरोग्य विभागाकडून, गेल्या काही दिवसांमध्ये आरोग्य मंत्र्यांना भेटलेल्या लोकांचा तपास सुरु आहे. आतापर्यंत ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची ३८२ प्रकरणं समोर आली आहेत. त्यापैकी ६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.


दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून जगभारात कोरोना व्हायरसने हाहाकार घातला आहे. अद्याप यावर कोणतेही ठोस उपाय शोधण्यात आलेले नाहीत. जगातील ९१ देशांमध्ये हा कोरोना व्हायरस पोहोचला आहे. चीनच्या वुहानमधला नॅशनल बायोसेफ्टी लॅब सध्या रहस्याचं केंद्रबिंदू बनला आहे.