भारत-चीन सीमेवरही कोरोनाचा प्रभाव
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे.
नवी दिल्ली : गेल्या काहीदिवसांपासून कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव होवू नये यासाठी खबरदारी बाळगण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचे पडसाद संपूर्ण जगावर उमटलेल्याचं चित्र समोर येत आहे. एवढचं नाही तर भारत आणि चीनच्या नियंत्रण रेषेवर देखील खबरदारी घेतली जात आहे. नियंत्रण रेषेवर तैनात असलेले जवान हात मिळवण्याऐवशी लांबून एकमेकांना नमस्ते करत आहेत. विषाणूचं संसर्ग होवू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
संरक्षण मंत्रालयच्या एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, गेल्या महिन्यात लडाखच्या चुशूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सैनिकांच्या वैयक्तिक बैठकीत (Border Personnel Meeting) जवान मास्क घालून उपस्थित होते. या बैठकीमध्ये दोन्ही देशांचे १० जवान उपस्थित राहतात.
सैनिकांची ही वैयक्तिक बैठक फक्त राष्ट्रीय दिन आणि महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येते. परंतु आता कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता ही बैढक रद्द देखील करण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आरोग्य मंत्रालयाच्या मदतीने भारत आणि चीनच्या सीमा रेषे लगत Quarantine facilityची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यामुळे जवान गरज पडल्यास स्वत:ची आरोग्य तपासणी देखील करू शकतील. सध्या भारतात देखील कोरोना व्हायरसमुळे भीती पसरली आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाचे २९ रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याची बातमी समोर येत आहे.
धक्कादायक म्हणजे आता पर्यंत संपूर्ण जगात एकूण ९०८३९ नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर ३११० नागरिकांचा कोरोना व्हायरसने बळी घेतला आहे.