लंडन : जगभरात कोरोनाचा कहर आणखी वाढला आहे. जगभरात मृतांचा आकडा १९ हजारावर गेला आहे. जगभरातल्या मृतांची संख्या १९१०१ इतकी झाली आहे. २४ तासांत इटलीत ७४३ तर स्पेनमध्ये ६८० रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही संख्या दर तासाला वाढतच आहे. इटलीपाठोपाठ स्पेनमध्येही चीनपेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. आतापर्यंत स्पेनमध्ये कोरोनामुळे ३४३४ जणांचा बळी गेला आहे. तर अमेरिकेत गेले दोन दिवस प्रतिदिन १०० हून अधिक बळी गेले होते. पण मंगळवारी एकाच दिवशी अमेरिकेत २२५ बळी गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. तब्बल १९७ देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. २४ तासांत त्यात ५० हजार नवे रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. त्यातल्या त्यात चांगली बातमी म्हणजे १ लाख ९ हजार रुग्ण बरे झाले आहेत.


इटली, स्पेन, अमेरिकेत मृतांची संख्या वाढली


इटलीमध्ये कोरोनाचा कहर थांबायचं नाव घेत नाही.  इटलीत दररोज ६७२ च्या सरासरीनं गेल्या पाच दिवसांत ३३६५ रुग्णांचा मृत्यू झालाय. तर १० दिवसांत ५३२९ रुग्णांचा मृत्यू झालाय.


स्पेनमध्ये कोरोनाचं संकट इटलीप्रमाणेच आणखी जोर धरू लागलं आहे. स्पेनमध्ये मृतांची संख्या तीन हजारांच्या जवळ पोहचली असून एक-दोन दिवसांत स्पेन चीनलाही मागे टाकेल अशी शक्यता आहे. २४ तासांत स्पेनमध्ये ६८० रुग्णांचा बळी गेला आणि मृतांची संख्या २९९१ वर पोहचली. स्पेनमध्ये गेला आठवडा भर प्रतिदिन मृतांची संख्या १०० पेक्षा जास्त असून अवघ्या ५ दिवसांत २१६० बळी गेलेत.


फ्रान्समध्ये बळींची संख्या ११०० 


फ्रान्समध्ये कोरोनाच्या बळींची संख्या ११०० झाली आहे. फ्रान्समध्ये सलग चार दिवस १०० हून अधिक बळी जात असून २४ तासांत तिथं २४० बळी गेलेत. फ्रान्समधील मृतांचा आकडा हा केवळ रुग्णांतलांतील असून प्रत्यक्षात यापेक्षा अधिक मृत्यू झाले असावेत, असं हॉस्पिटलच्या प्रमुखांनी म्हटलंय. घरी आणि वृद्धाश्रमात झालेल्या मृत्युंची आताच्या आकडेवारीत नोंद नाही, अशी माहिती त्यांनी दिलीय.


अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे तशी मृतांचीही संख्या वाढत आहे. अमेरिकेत आठवडाभरात सुमारे ५० हजार रुग्ण वाढले. तर मृतांचा आकडा ७८४ वर पोहचला. २४ तासांत अमेरिकेत २२५ जणांचा मृत्यू झाला.


ब्रिटनमध्ये ८७ जणांचा कोरोनानं मृत्यू


ब्रिटनमध्येही मंगळवारी ८७ जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. तिथं मृतांची संख्या ४२२ वर पोहचली आहे. तर चीनमध्ये मात्र कोरोना आटोक्यात आला असून मंगळवारी केवळ ४ जणांचा मृत्यू झाला. चीनमध्ये कोरोना बळींची संख्या ३२८१ इतकी आहे.


इराणमध्ये सलग १० दिवस १०० हून अधिक बळी गेले आहेत. मंगळवारी १२२ जणांचा मृत्यू झाला आणि इराणमध्ये कोरोना बळींची संख्या दोन हजाराचा आकडा पार करून २०७७ इतकी झाली.


कोरोनाच्या संकटानं जगभरातल्या प्रमुख नेत्यांना ग्रासलं असून सात देशांत मृतांची संख्या तीन अंकी आहे तर पाच देशांत कोरोना बळींची संख्या चार अंकी आहे.