Covid 19 : कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. चीनमधील 27 हून अधिक प्रांत कोरोना महामारीच्या विळख्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 412 नवीन कोरोना रुग्णांची वाढ (Corona cases in china) झाली आहे. दोन वर्षानंतर इतकी मोठी वाढ झाली आहे. शांघायमध्ये एका दिवसात विक्रमी 8 हजार 581 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील अनेक प्रांतांमध्ये अतिशय धोकादायक मानला जाणारा ओमायक्रॉन झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की चीनच्या प्रशासनाने देशाची आर्थिक राजधानी शांघायमध्ये लॉकडाऊन (Lockdown) लागू केले आहे. एवढेच नाही तर दोन कोटींहून अधिक नागरिकांच्या कोरोना तपासणीसाठी येथे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 


28 मार्च रोजी शहरात दोन टप्प्यांचा लॉकडाऊन सुरू झाला. या काळात लोकांना घरातच राहण्यास सांगितले जात आहे. बाहेर पडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. एवढेच नव्हे तर शहरातील आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. परदेशात निर्यात होणाऱ्या मालाचा पुरवठा बंद करण्यात आला आहे.


चीनने सोमवारपासून चाचणीची मोठी मोहीम सुरू केली आहे. चाचणीसाठी लष्कराचे जवान आणि डॉक्टर मोठ्या संख्येने मैदानात उतरले आहेत. चीनच्या लष्कर पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या 2000 हून अधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रविवारी शांघाय येथे कोरोना चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जिआंगसू, जिजियांग आणि बीजिंगसह अनेक प्रांतातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीही तेथे पाठवण्यात आले आहेत. अशाप्रकारे 10 हजारांहून अधिक लोकांचे पथक चाचणी मोहिमेत गुंतले आहे.


चीनमधील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की शांघाय (Shanghai) मधील कोणत्याही रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यासाठी जागा उरलेली नाही. असे असूनही, चीनचा दावा आहे की शांघायमध्ये आतापर्यंत एकाही व्यक्तीचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला नाही.