कोविड-१९ : जगातील घडामोडींवर एक नजर, १५६ देशांची एकजूट
जगातील १५६ देशांनी कोव्हॅक्स मोहिमेसाठी एकजूट दर्शवली आहे.
लंडन : जगातील १५६ देशांनी कोव्हॅक्स मोहिमेसाठी एकजूट दर्शवलीय. जगात कोरोनावरील लस आल्यानंतर तिचं जगभरात समान वाटप व्हावे, हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून पुढाकार घेतला जात आहे.
२०२१ च्या अखेरपर्यंत २ अब्ज लसींचं वितरणाचे उद्दीष्ट असल्याचं 'गावी' चे प्रमुख सेथ बर्कली यांनी सांगितले आहे. यासाठी जगातील ६४ संपन्न देशांसह WHO सतत संपर्कात असल्याचं WHO चे संचालक टेड्रोस घेब्रेयासेस यांनी सांगितले.
सरकारांविरोधात रोष वाढतोय
जगभरातला कोरोनाचा कहर काही केल्या थांबत नाहीए आणि आता सर्वच देशांमधल्या सरकारांविरोधात रोष वाढू लागलाय. त्यात आता काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर 'आय से नो टू मेझर्स' अशी मोहीमच सुरू केलीय. तर त्यांची ही भूमिका बेजबाबदार असल्याची टीका काही महत्त्वाच्या सत्ताधाऱ्यांकडून केली जातेय. दरम्यान, काही सेलिब्रिटींनी या मोहिमेला उत्तर म्हणून #weardamnmask अशी मोहिम सुरू केली आहे.
लसची मानवी चाचणी सुरु
एकच डोस असणारी जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसची बुधावारपासून मानवी चाचणी सुरु झाली आहे. ६० हजार नागिराकंना ही लस देण्यात येणार आहे. इतर लसींच्या तुलनेत ही लस देण्यास सुलभ असल्याचं जॉन्सन अँड जॉन्सनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. तिसऱ्या टप्प्यातील या लशीचा निकाल वर्षा अखेरीस किंवा नववर्षाच्या सुरुवातील मिळणं अपेक्षित आहे.
अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सननं करोनावरील लस विकसित करण्यात महत्त्वाचा टप्पा गाठल्याचं ट्रम्प यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी ज्यो बायडेन यांच्यावरही टीका केली. आम्ही आर्थिक सुधारणांना सर्वात वेगानं पुढे नेल्यात.. आमचा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. मात्र बायडेन हे विज्ञान विरोधी दृष्टीकोन असलेलेल व्यक्ती आहेत, असे ट्रम्प म्हणालेत.
बेल्जियममध्ये कोरोनाचा संसर्ग
बेल्जियममध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी काहीकाळ निर्बंधांचं पालन करावं असं आवाहन पंतप्रधान सोफी विल्मेस यांनी केलंय. राजधानी ब्रुसेल्स आणि इतर शहरातं दुकानांत, सिनेमागृहांत तसंच सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं अनिवार्य आहे. तसंच १ ऑक्टोबरपासून हायरिस्कमध्ये आलेल्या नागरिकांना सात दिवस अलग ठेवणं गरजेचं असल्याचं ते म्हणालेत.
विमानतळांवर कोरोनाचाचणी अनिवार्य
फ्रान्सहून परतणाऱ्या प्रवाशांची रोममधील विमानतळांवर कोरोनाचाचणी अनिवार्य करण्यात आलीये. या प्रवाशांना ३० मिनिटांची रॅपिड टेस्ट करावी लागणार आहे. आतापर्यंत माल्टा, स्पेन, ग्रीस आणि क्रोएशियातून येणाऱ्या प्रवाशांचीच कोरोनाटेस्ट केली जात होती. मात्र गेल्या काही दिवसांत फ्रान्समध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानं इटलीनं फ्रान्समधील प्रवाशांचीही चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.
फ्रान्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने
ऑगस्टपासून फ्रान्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होऊ लागलाय. फ्रान्सच्या मार्सेली, ग्वाडलूप या भागांना रेड झोन घोषित करण्यात आलाय. त्यामुळे येथील बार आणि रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. पॅरिस आणि लगतच्या भागांतही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. येथील बार आणि रेस्टॉरंट रात्री १० नंतर बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत.
चेक रिपब्लिकमध्ये आता धुमाकूळ
कोरोनाची सर्वात कमी प्रकरणं समोर आल्यानं जून महिन्यात आनंदोत्सव साजरा करणाऱ्या चेक रिपब्लिकमध्ये आता कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. वेगानं पसरणाऱ्या साथीच्या आजारानं येथील आरोग्य व्यवस्थेवर ताण आलाय. मे आणि जूनमध्येच येथील निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आले होते. त्यामुळे या देशात कोनाचा प्रादूर्भाव झापाट्यानं झाला.