Crime News : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये. आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका तरुण विद्यार्थ्याचा अमेरिकेत मृतदेह आढळून आला आहे. परचुरी अभिजीत (20) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. आरोपींनी अभिजीतचा मृतदेह एका कारमध्ये जंगलात सोडला होता. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असून अभिजीतच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिजीत हा परचुरी चक्रधर आणि श्रीलक्ष्मी यांचा एकुलता एक मुलगा होता. अभिजीत हा लहानपणापासूनच परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत होता. अभिजित लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी होताअभिजितच्या आईने सुरुवातीला आपल्या मुलाची उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा नाकारली होती. मात्र तिने त्याच्या भविष्याचा विचार करुन परदेशात जाण्याला होकार दिला, असे अभिजीतच्या कुटुंबीयांनी सांगितले. अभिजितला इंजिनीअरिंगची जागा मिळाल्यानंतर तो बोस्टन विद्यापीठात गेला होता.


हल्लेखोरांनी पैसे आणि लॅपटॉपसाठी अभिजीत लक्ष्य केले असावे, असा पोलीस अधिकाऱ्यांना संशय आहे. मात्र  अभिजीतच्या हत्येच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीने विद्यापीठामधल्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. अभिजीतचा विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांशी वाद झाला असावा, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेत आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अभिजीतचा मृतदेह गुंटूर जिल्ह्यातील बुरीपलेम येथे आणण्यात आला.


भारतीय विद्यार्थ्यांना याआधीही केलं लक्ष्य
 
दरम्यान, गेल्या वर्षी देखील 20 ऑक्टोबर रोजी भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची अमेरिकतल्या इंडियाना येथे हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी 20 वर्षीय मुलाच्या कोरियन रूममेटला ताब्यात घेण्यात आले होते. तर पर्ड्यू विद्यापीठात शिकणारा इंडियानापोलिस इथला वरुण मनीष छेडा हा कॅम्पसच्या पश्चिमेकडील मॅककचॉन हॉलमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. आणखी एका घटनेत, जॉर्जियामधील एका दुकानामध्ये काम करणाऱ्या 25 वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर ज्युलियन फॉकनर नावाच्या बेघर माणसाने क्रूरपणे हल्ला करुन त्याची हत्या केली होती.