पैसे उसणे घ्यायची अन्..., सायनाईड वापरुन 14 मित्र-मैत्रिणींना संपवलं; पोलीसही थक्क
Crime News Woman Gets Death Sentence: चालता चालता एका तरुणीचा पडून मृत्यू झाल्यानंतर शंका उपस्थित करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता धक्कादायक खुलासा समोर आला.
Crime News Woman Gets Death Sentence: थायलंडमधील एका महिलेला कोर्टानं शिक्षा सुनावली आहे. थायलंडच्या इतिहासातील सर्वात धक्कादायक हत्याकांड घडवून आणणारी ही महिला आहे. ही महिला सिरिअल किलर असून तिने आपल्याच जवळच्या मित्रांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. मित्र-मैत्रिणींवर सायनाईडच्या माध्यमातून विषप्रयोग करुन तिने त्यांना संपवल्याचं कोर्टात सिद्ध झालं आहे. या महिलेने एक-दोन नाही तर अशाप्रकारे 14 मित्र-मैत्रिणींना जीवे मारलं आहे. या महिलेचं नाव सररत रंगसीवुथापोर्न असं असून ती 36 वर्षांची आहे, असं वृत्त 'द गार्डियन'ने दिलं आहे.
कशासाठी हवे असायचे पैसे?
सररतला जुगाराचं व्यसन लागलं होतं. ती ऑनलाइन माध्यमातून जुगार खेळायची. सररतने जुगार खेळण्यासाठी आपल्या मित्र-मैत्रिणींकडून वेळोवेळी उधारीवर पैसे घेतले. मात्र त्यानंतर पैसे परत करण्याऐवजी ती त्यांना सायनाइड खायला घालून मारलं. थायलंडमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सररताने जवळच्या व्यक्तींकडून हजारो डॉलर्स उधार घेतले होते. पण हे पैसे परत देता येत नसल्याने ओळखीचा फायदा घेऊन कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांना सायनाइड खायला घालून ठार केलं.
चालता चालता पडली अन् मृत्यू झाला
बुधवारी, बँकॉकमधील कोर्टाने सररतला तिच्या मित्रांच्या हत्या प्रकरणी दोषी ठरवलं आहे. या खटल्यामध्ये सररताविरोधात सिरिपोर्न खानवोंगच्या हत्येचा आरोप सिद्ध झालं. हे दोघे एप्रिल 2022 मध्ये बँकॉकजवळ भेटले होते. मेह केलाँग नदीमध्ये मासे सोडण्याच्या धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी ही भेट झाली होती. या भेटीनंतर सिरिपोर्न खानवोंग अचानक चालता चालता पडली आणि तिचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टममध्ये सिरिपोर्न खानवोंगच्या शरीरामध्ये सायनाइडचा अंश आढळून आला.
धक्कादायक खुलासा
यानंतर पोलिसांनी सिरिपोर्न खानवोंगच्या मृत्यूप्रकरणी संशयावरुन सररतला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने अशाप्रकारे सायनाइड पॉयझनिंगच्या माध्यमातून 2015 पासून 13 जणांना संपवल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला. या निकालानंतर मरण पावलेल्या सिरिपोर्न खानवोंगच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना, "मला माझ्या मृत मुलीला इतकेच सांगायचं आहे की मला तिची रोज आठवण येते आणि आज तिला न्याय मिळाला आहे," असं सांगितलं.
कसं द्यायची पॉयझन?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुगार खेळण्यासाठी सररतने तिच्या मित्र-मैत्रिणींकडून जवळपास स्थानिक चलनामधील 3 लाखांची रक्कम घेतली होती. सररत मित्र-मैत्रिणींना संपवल्यानंतर त्यांचे दागिने, मोबाईलही चोरायची. तिने अशाप्रकारे 15 जणांवर विषप्रयोग केला असून त्यामधून केवळ एक व्यक्ती बचावली आहे. ती अनेकांनी हर्बल गोळी म्हणून सायनाईडचा अंश असलेली कॅप्सूल खाऊ घालायची.
पोलिसांनी काय सांगितलं?
"तिच्या ओळखीतील लोकांकडे ती पैसे मागायची. आपल्याला क्रेडिट कार्ड पेमेंटचा फार जास्त खर्च आला आहे, असं सांगून ती पैसे घ्यायची. कोणी पैसे परत मागितल्यास ती विषप्रयोग करुन त्यांना संपवायची," असं पोलिसांनी सररतच्या कृत्याबद्दल बोलताना सांगितलं.
मृत्यूदंडाची शिक्षा
सररतविरुद्ध एकूण 14 जणांच्या हत्येचा खटला चालवण्यात आला. तिने एकूण 80 गुन्हे केल्याचं सिद्ध झालं. तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.