Crocodile Returns Dead Body: नदीमध्ये बुडून मरण पावलेल्या एका चार वर्षांच्या मुलाचा मृतदेह एका मगरीनेच मृतदेहाचा शोध घेणाऱ्या टीमला आणून दिल्याची धक्कादायक घटना इंडोनेशियामध्ये (Indonesia) घडली आहे. येथील मुआरा जावा या छोट्याश्या शहरामधील नागरिकांनी हा सारा प्रकार प्रत्यक्ष पाहिला आणि त्यांना धक्काच बसला. मागील अनेक दिवसांपासून या मुलाच्या घरचे त्याचा शोध घेत असतानाच ही मगर नदीमधून पाठीवर या मुलाचा मृतदेह घेऊन आली आणि मृतदेह एका बोटीजवळ सोडून निघून गेली.


अशापद्धतीने सापडला मृतदेह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार वर्षीय मोहम्मद झियाद विजया हा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होता. पूर्व कालिमंतानमधील जावा इस्तूरेमधून हा मुलगा बेपत्ता झाला होता. स्थानिक तपास यंत्रणांबरोबरच द इस्ट कालिमंतान बासारनास सर्च अॅण्ड रेस्क्यू एजन्सीही या मुलाचा शोध घेत होती. मात्र दोन दिवसांमध्ये त्यांना या मुलाबद्दलची कोणतीही माहिती मिळालेली नव्हती. मात्र बोर्नियो येथील महाकाम नदीमध्ये सर्वांनाच चकित करणारी एक घटना घडली. या नदीमध्ये मासेमारी करणाऱ्या काहीजणांना एक 10 फूट लांबीची मगर या मुलाचा मृतदेह घेऊन बोटीच्या दिशेने येत असल्याचं दिसलं. ही मगर तब्बल 700 फूटांवरुनच लोकांना दिसत होती. समोर दिसणारं दृष्य पाहून बोटीवरील दोघांनाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.


मगरीने चावा घेतल्याचे निशाण नाहीत


सर्वात धोकादायक शिकाऱ्यांपैकी एक अशी ओळख असलेल्या मगरीने या मुलाचा मृतदेह या बोटीजवळ सोडला आणि ती पाण्यात दिसेनाशी झाली. बोटीवरील दोन व्यक्तींना हा मृतदेह खेचून बोटीत घेतला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलाच्या मृतदेहावर मगरीने चावा घेतल्याचे निशाण दिसून आलेले नाही. म्हणजेच या मुलावर या मगरीने हल्ला केलेला नव्हता. 


खेळता खेळता पडलेला नदीत


हा मुलगा महाकाम नदीमध्ये बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. घराजवळ खेळता खेळता हा मुलगा नदीत पडल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. ही शक्यता खरी निघाली मात्र ज्या पद्धतीने मोहम्मद झियादचा मृतदेह सापडला ती घटना मृत्यूपेक्षा अधिक जास्त चर्चेचा विषय ठरत आहे.


दरवर्षी एका हजाराहून अधिक लोक मगरींच्या हल्ल्यात मरतात


दरवर्षी जगभामध्ये एक हजाराहून अधिक जणांचा मगरींच्या हल्लीत मृत्यू होतो असं क्रॉकबाईटच्या आकडेवारी स्पष्ट होत आहे. मात्र ही आकडेवारी केवळ नोंद झालेल्या हल्ल्यांबद्दलची आहे. अशाप्रकारे नोंद न झालेले अनेक हल्ले जगभरात होत असतात.


यापूर्वीही घडलेला असा मृतदेह परत करण्याचा प्रकार


यापूर्वी 2017 साली अशाप्रकारे एका 41 वर्षीय व्यक्तीवर मगरीने हल्ला करुन तिला नदीत खेचलं होतं. यामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र नंतर मगरीने हा मृतदेह पुन्हा नदीच्या किनाऱ्यावर सोडला होता. हा प्रकारही पूर्व कालिमंतानमध्ये घडला होता.