अमेरिकेला ललकारणाऱ्या नेत्याच्या मुलाची आत्महत्या

क्युबाचे माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान फिदेल कास्रो यांचा मोठा मुलगा डियाज बालार्ट यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय.
हवाना : क्युबाचे माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान फिदेल कास्रो यांचा मोठा मुलगा डियाज बालार्ट यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय.
क्युबाच्या मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, डियाज गेल्या अनेक काळापासून नैराश्येत होते. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचारही सुरू होते. परंतु, त्यांनी अखेर आपलं जीवनयात्रा संपवून आपला हा त्रास कमी केलाय.
डियाज ६८ वर्षांचे होते... ते हुबेहुब आपल्या वडिलांसारखेच दिसत होते म्हणून त्यांना 'फिडेलिटो' म्हणूनही ओळखलं जात होतं.
नैराश्यग्रस्त डियाज यांना काही दिवस हॉस्पीटलमध्येही दाखल करण्यात आलं होतं. परंतु, नंतर मात्र त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. ते व्यावसायानं न्युक्लिअर फिजिसिस्ट होते. सोव्हियत युनियनमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं.
क्रांतिकारचा मुलगा
डियाज बालार्ट यांचे पिता फिदेल कास्रो यांना क्युबाचे क्रांतिकारक नेता म्हणून ओळखलं जातं. त्यांचं निधन २६ नोव्हेंबर २०१६ मध्ये झालं होतं... मृत्यूसमयी ते ९० वर्षांचे होते.
कास्रो यांनी एक लोकप्रिय कम्युनिस्ट सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर ते कित्येक दशकांपर्यंत अमेरिकेच्या डोळ्यांत सलत होते. अमेरिकन सरकारनं अनेकदा त्यांना ठार मारण्याचाही प्रयत्न केला परंतु, यात त्यांना यश मिळालं नाही.
कास्रो १९५९ ते डिसेंबर १९७६ पर्यंत क्युबाच्या पंतप्रधानपदी विराजमान होते. त्यानंतर पुन्हा क्युबाच्या राज्य परिषदेचे ते अध्यक्ष (राष्ट्रपती) होते. क्युबाच्या सशस्त्र दलाचं 'कमांडर इन चीफ'चं पदही त्यांनी आपल्याकडेच ठेवलं होतं. आश्चर्य म्हणजे, हुकूमशाहीवर टीका करणाऱ्या कास्रो यांनाही एक 'हुकूमशाह' म्हणून ओळखलं जातं होतं.