ब्युरो रिपोर्ट, झी २४ तास : एका वर्षात तब्बल 20 लाख नागरिकांचे बळी घेणाऱ्या कोविड-19 या व्हायरसचा उगम चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान या शहरात झाला, हे सगळ्या जगाला माहितीये. याबाबत चीननं सांगितलेली थिअरी अशी की, कोविडची लागण झालेलं वटवाघूळ खाल्ल्यामुळे  माणसांमध्ये या विषाणूचा प्रवेश झाला. मात्र चीन पहिल्यापासूनच लपवाछपवी करत आलाय. त्यामुळे त्यांच्या या कथेवर कुणाचाच विश्वास नव्हता.आता तैवान न्यूजनं याबाबत एक धक्कादायक वास्तव उजेडात आणलंय..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनची सरकारी वाहिनी CCTVनं 29 डिसेंबर 2017 रोजी एक डॉक्युमेंट्री केली होती. हुबेई प्रांतातील कोरोना संक्रमित वटवाघळांच्या गुहेची माहिती यात देण्यात आली होती. बायोसेफ्टी लेव्हल 4ची लॅब अशी ओळख असलेल्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीचे संशोधक या गुहेमध्ये संशोधन करत होते. या माहितीपटात वटवाघळांची साद्यंत माहिती देण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे याच डॉक्युमेंट्रीमध्ये एका संशोधकानं आपल्याला वटवाघळानं चावा घेतल्याचं सांगितलं होतं. 


"त्या वटवाघळाचे विषारी दात रबरी ग्लोव्हजमधून माझ्या हातात घुसले. हातावर कोणी सुई टोचावी, असं मला त्यावेळी वाटलं'' हे त्या संशोधकाचे शब्द होते. वटवाघळानं चावा घेतल्यानंतर हाताला आलेली सूज तो दाखवतो आणि त्याच वेळी वटवाघळांमध्ये असलेले विषाणू कसे घातक असू शकतात, ही अक्कलही शिकवतोय.
 
याचाच अर्थ कोरोना विषाणूचं संक्रमण हे वटवाघूळ खाल्ल्यामुळे नव्हे, तर संशोधकाला वटवाघळानं चावा घेतल्यामुळे माणसामध्ये आलेलं असू शकतं. मात्र वुहान इन्स्टिट्यूट आणि चीननं ही बाब जगापासून दडवून ठेवली... 
याच डॉक्युमेंट्रीमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी आहेत... एक संशोधक हँडग्लोव्ज न घातलाच वटवाघळांना हाताळत असल्याचं स्पष्ट दिसतंय... अनेक संशोधकांनी पीपीई किट, मास्क घातले नसल्याचंही समोर आलंय. 



गुहेत जाण्यापूर्वी संशोधकांना रेबीजचं इंजेक्शन दिल्याचा दावा सीसीटीव्हीच्या या डॉक्युमेंट्रीत करण्यात आला होता. पण कोरोनासारख्या घातक व्हायरसवर रेबीज किती परिणामकारक असेल, हे वुहानच्या संशोधकांना नक्कीच माहित असावं... तरीदेखील अत्यंत निष्काळजीपणे हे प्रकरण हाताळण्यात आल्याचं स्पष्ट झालंय... कोरोनाच्या उगमाबाबत चीनची लपवाछपवी सुरूच आहे.


जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमला प्रथम वुहानमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. जागतिक दबावानंतर टीमला प्रवेश दिला, मात्र कोरोनाच्या नावाखाली क्वारंटाईन केलं. सत्य बाहेर येऊ नये, यासाठी ड्रॅगन कसोशीनं प्रयत्न करतोय... त्यासाठी CCTVनं 2017 साली केलेली ही डॉक्युमेंट्रीही आता हटवण्यात आलीये... पण कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहात नाही.


सत्य कधी ना कधी बाहेर येतंच. कोरोनाच्या साथीचं वुहान कनेक्शन आणि त्यावर पांघरूण घालण्याचे सरकारचे धंदे आता उजेडात येऊ लागलेत. आगामी काळात शी जिनपिंग यांना याचं उत्तर द्यावंच लागेल.