Divorce Hotel : लग्न हे दोन जीवाच मिलन मानलं जात. विश्वास, प्रेम आणि नात्याबद्दल समर्पण यातून संसार फुलतो आणि शेवटपर्यंत टिकतो. पूर्वी कितीही काही समस्या आल्या तरी नवरा बायको एकत्र राहायचे. पण हल्ली छोट्या छोट्या गोष्टींवरुन वादावादी आणि नंतर त्यातून नातं घटस्फोटापर्यंत सहज पोहोचत. गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटाची प्रकरणे खूप जास्त ऐकण्यात येत आहेत. त्यात घटस्फोटाचा एक विचित्र आणि आश्चर्यकारक ट्रेंड उदयास आला आहे. ऐकावं ते नवलंच, होय घटस्फोटाचा नवीन ट्रेंड...घटस्फोटासाठी काही महिने लागतात. पण या देशात अशी अवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे जोडप्याचा घटस्फोट वीकेंड पुरेसा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेदरलँडमधील 33 वर्षीय व्यावसायिक जिम हॅफेन्स यांनी हे नवीन बिझनेस मॉडेल सादर केलाय. त्याने असा दावा केलाय की येथे तुम्ही शुक्रवारी विवाहित असाल तर रविवारपर्यंत तुमचा घटस्फोट होईल. त्यासाठी एक खास हॉटेल उभं करण्यात आलंय. 


'डिव्होर्स हॉटेल' कसं चालतं?


या अनोख्या हॉटेलमध्ये तुम्हाला घटस्फोटाचे संपूर्ण पॅकेज मिळतं. वकील आणि मध्यस्थांची टीमपासून सर्व व्यवस्था या हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. शुक्रवारी चेक इन केल्यावर आणि घटस्फोटाच्या कागदपत्रांसह रविवारी तुम्ही चेक आऊट करता. हे सर्व एका ठराविक फीसाठी आणि हो, या संपूर्ण प्रक्रियेला रिॲलिटी टीव्ही शोमध्ये रूपांतरित केलं जाऊ शकतं. 


'डिव्होर्स हॉटेल'ची गरज का होती?


हे हॉटेल तुम्हाला असे वातावरण देतं जिथे जोडप्यांचे घटस्फोट सोपं केलं जातात. घटस्फोटासाठी लांब आणि कठीण कायदेशीर मार्गाने जाण्याऐवजी सोपा मार्ग या हॉटेलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलाय. हॉटेलमध्ये एक खास वातावरण आणि यंत्रणा तयार करण्यात आली आहे. जे एकाच वेळी कायदेशीर सल्ला, मानसिक आधार आणि मध्यस्थी देते, जेणेकरून घटस्फोटाची प्रक्रिया कोणत्याही तणावाशिवाय जलद आणि शांततेने पूर्ण करण्यात येते. 


हे 'घटस्फोट हॉटेल' कुठल्या शहरांमध्ये आहे?


हे हॉटेल नेदरलँडच्या हार्लेम शहरात आहे. याला 'द सेपरेशन इन' असेही म्हणतात. या योजनेने नेदरलँड्समध्ये तुफान चर्चा आहे. आतापर्यंत, 17 जोडप्यांनी त्याचा वापर केला आहे, त्यापैकी 16 जोडप्यांनी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर आनंदाने स्वाक्षरी केलीय. या 'डिव्होर्स हॉटेलची फी 10 हजार ते 15 हजार डॉलर्स दरम्यान ठेवण्यात आली आहे. आता जिम हे अमेरिकन शहरांमध्ये आणण्याच्या तयारीत आहेत, जिथे न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिससारख्या मोठ्या हॉटेल्सची त्यासाठी निवड केली आहे. 


यावर अमेरिकन वकील काय म्हणतात?


अमेरिकेतील प्रसिद्ध घटस्फोट वकील रॉबर्ट एस. कोहेन म्हणतात, 'ही कल्पना जितकी आकर्षक वाटते तितकीच पण अव्यवहार्यही आहे. घटस्फोटाची वेळ खूप भावनिक असते आणि प्रत्येकाला दोन दिवसात सर्वकाही सोडवणे शक्य नसतं. त्याला व्यवसाय आणि पॅकेज म्हणून सादर करणे अजिबात योग्य नाही. पण सध्या घटस्फोट हा देखील एक मोठा व्यवसाय झाला आहे. 


अमेरिकेतील घटस्फोट उद्योग 175 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. दरवर्षी 1.2 दशलक्ष लोक घटस्फोटासाठी अर्ज करतात. अशा स्थितीत 'डिव्होर्स हॉटेल' या प्रचंड बाजारपेठेत खळबळ माजवणार आहे.