नवी दिल्ली : भारत- चीन सीमेवर तणाव वाढला आहे. चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सिक्कीम आणि अरुणाचलमध्ये भारताकडून आणखी जवान तैनात करण्यात आलेत. भारतीय लष्कराकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोकलाममधून मागे हटण्याच्या चीनच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे सीमेवर तणाव वाढला असून, भारतानेही सिक्कीम, अरुणाचल प्रदेशांतील सीमेवर सैन्य वाढवले आहे. चीनची खुमखुमी कायम असून, सतत युद्धाची भाषा बोलली जात आहे. त्यामुळे भारतानेही सावध राहण्यासाठी सैन्य वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


दुसरीकडे कोणत्याही संकटाला किंवा अडचणींचा सामना करायला भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याचे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत स्पष्ट केलं. तिबटेच्या काही भागात चीनने आपले सैन्य आणायला सुरुवात केली असल्याच्या वृत्ताकडे लक्ष वेधता जेटली यांनी हे विधान केलं. 


भारतीय लष्कराकडे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक ती शस्त्रसामग्री आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं.. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भूतानचे परराष्ट्रमंत्री दामचो दोरजी यांच्याशी चर्चा केली. डोकलामशी संबंधित मुद्द्यांवर त्यांच्या चर्चेचा भर होता, असे सांगण्यात आले. मात्र चर्चेचा तपशील जाहीर करण्यात आला नाही.