वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसच्या संकटात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत. अमेरिकेतला H1B आणि रोजगार देणारे इतर व्हिसा रद्द करण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे. अमेरिकेतली वाढती बेरोजगारी बघता ट्रम्प हा निर्णय घेऊ शकतात, असं वृत्त तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रामध्ये आलं आहे. अमेरिकेनं H1B व्हिसा रद्द केला, तर याचा फटका आयटी क्षेत्रातल्या भारतीयांना बसेल. कारण भारतातले बरेच नागरिक अमेरिकेत रोजगारासाठी याच व्हिसावर जातात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतल्या स्थानिक वृत्तांनुसार ट्रम्प सरकार पुढच्या आर्थिक वर्षात व्हिसा निलंबनाला मंजुरी देऊ शकते. अमेरिकेत आर्थिक वर्ष ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होतं. याचवेळी अनेक नवे व्हिसा दिले जातात. प्रशासनातल्या एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिल्याचं वृत्तपत्राचं म्हणणं आहे. 


ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतला तर H1B व्हिसा निलंबन संपत नाही तोपर्यंत कोणताही बाहेरचा नागरिक अमेरिकेत नोकरी करू शकणार नाही. पण ज्यांच्याकडे आधीपासूनच H1B व्हिसा आहे, त्यांना या निर्णयामुळे चिंता करण्याची गरज नाही, असंही सांगण्यात आलं आहे. 


H1B हा नॉन-इमिग्रेशन व्हिसा आहे. अमेरिकेतल्या कंपन्यांना परदेशी नागरिकांना नोकरी देण्याची सुविधा हा व्हिसा देतो. अमेरिकेतल्या आयटी कंपन्या हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवण्यासाठी भारत आणि चीनवर अवलंबून असते. त्यामुळे अमेरिकन सरकारच्या या निर्णयाचा परिणाम अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या हजारो भारतीयांवर होऊ शकतो. अमेरिकेत आधीच H1B व्हिसा धारकांना नोकरी गमवावी लागली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात त्यांना भारतात परतावं लागत आहे.