भारत-पाकिस्तान दरम्यानच्या काश्मीरप्रश्नात डोनाल्ड तात्यांची पुन्हा एकदा लुडबूड
या अगोदर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा मध्यस्थतेसाठीचा प्रस्ताव भारतानं स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला होता
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीर मुद्द्यात उडी घेतलीय. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत - पाकिस्तान द्विपक्षीय दरम्यान चर्चेसंबंधात वादग्रस्त वक्तव्य केलंय. 'भारत आणि पाकिस्तान दरम्यान मध्यस्थतेसाठी मी तयार आहे' असं डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा म्हटलंय.
'मध्यस्थतेचा प्रस्ताव स्वीकार करणं किंवा न करणं आता संपूर्णत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयावर अवलंबून आहे. पंतप्रधान मोदी आणि इमरान खान दोन्ही खूप चांगले व्यक्ती आहेत. आणि दोघांनीही आपल्याशी काश्मीर मुद्यावर दिलखुलास बातचीत केली' अशी पुश्तीही त्यांनी यावेळी जोडलीय.
या अगोदर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा मध्यस्थतेसाठीचा प्रस्ताव भारतानं स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला होता. त्यानंतरही बोलताना ट्रम्प यांनी 'मी पंतप्रधान इमरान खान यांनाही भेटलो. मला वाटतं पंतप्रधान मोदी आणि इमरान खान दोघंही चांगले व्यक्ती आहेत. माझ्या म्हणण्याचा अर्थ की मला वाटतं ते दोघं चांगल्या पद्धतीनं एकमेकांसोबत येऊ शकतात. पंतप्रधान मोदींना असं वाटलं की काश्मीर मुद्यावर कुणी मध्यस्थता करावी तर मी या संदर्भात पाकिस्तानशी बातचीत केलीय आणि मी याच संदर्भात भारताशीही संवाद साधलाय. दीर्घकाळापासून हा वाद सुरू आहे' असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय.
याअगोदरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर मुद्यावर त्यांच्याकडे मदत मागितली होती. परंतु, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी मात्र 'पाकिस्तानशी सर्व प्रलंबित मुद्दे द्वीपक्षीय चर्चेनंच सुटतील. काश्मीरप्रश्नी कोणत्याही मध्यस्थता भारताला अमान्य आहे ही भारताची अनेक वर्षांची भूमिका आहे' असं स्पष्टपणे सांगितलं होतं.