न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा सार्वजनिकरित्या प्रशंसा केली. मोदींनी भारताला एकजूट केलं. त्यांना आपण 'भारताचे पिता' (फादर ऑफ इंडिया) असंही म्हणू शकतो, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी म्हटलंय. 'माझी पंतप्रधान मोदींसोबत केमिस्ट्री चांगली आहे' हे सांगायलाही डोनाल्ड ट्रम्प विसरले नाहीत. ते यूएनजीएच्या (The United Nations General Assembly) बैठकीत बोलत होते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मोदी हे महान व्यक्ती आणि महान नेते आहेत. मला आठवतंय, भारताची परिस्थिती खूपच खराब होती. खूप वाद होते परंतु, मोदी मात्र सगळ्यांना एकत्र घेऊन चालले. एका पित्याप्रमाणे त्यांना सर्वांना एकत्र घेतलं. त्यांना 'फादर ऑफ इंडिया'ही म्हटलं जाऊ शकतं. आम्ही तर त्यांना 'फादर ऑफ इंडिया'च म्हणणार, जर हे वाईट नसेल तर... परंतु त्यांनी अनेक गोष्टींचा ताळमेळ घातला. ही खूपच चांगली गोष्ट आहे' असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींसमोर म्हटलं. 


'मला भारत आवडतो आणि तुमचे पंतप्रधानही आवडतात. एनआरजी स्टेडियममध्ये खूपच जोश दिसला आणि माझ्या डाव्या बाजूला बसलेल्या जेंटलमनवर (मोदींकडे इशारा करून) ते खूप प्रेम करतात. लोक त्यांच्यावर भाळलेत. ते एलविस प्रेस्लीप्रमाणे आहेत. ते एलविसच्या अमेरिकन वर्जनप्रमाणे आहेत. लोक खरोखरच पंतप्रधानांवर प्रेम करतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे' असं म्हणत ट्रम्प यांनी मोदींची वाहवा केली.