मोदींच्या रणनितीला ट्रम्प यांचा धक्का, ऍपलला दिली धमकी
कोरोना व्हायरसच्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रणनितीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्का दिला आहे.
वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसच्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रणनितीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्का दिला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांसाठी भारतात पायघड्या घालण्याची योजना मोदी सरकारने आखली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र भारतात जाऊ इच्छिणाऱ्या ऍपल सारख्या कंपन्यांना उघड धमकी दिली आहे.
चीनमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या अमेरिकन कंपन्या जर पुन्हा अमेरिकेत आल्या नाहीत, तर त्यांच्यावर नवीन टॅक्स लावण्यात येईल,असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेत परतणाऱ्या कंपन्यांना टॅक्समध्ये सूट देण्यापेक्षा आम्ही अमेरिकेत पुन्हा न येणाऱ्या कंपन्यांना नवा टॅक्स लावू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
पीटीआयने ट्रम्प यांनी दिलेल्या मुलाखतीचा दाखला देत हे वृत्त दिलं आहे. अमेरिकन कंपन्यांनी पुन्हा एकदा त्यांचं उत्पादन अमेरिकेत सुरू करावं, त्यामुळे अमेरिकन नागरिकांना नोकऱ्या मिळतील, यासाठी ट्रम्प यांनी अनेकवेळा प्रयत्न केले. ट्रम्प यांनी मागच्या निवडणुकीत स्थानिकांचा रोजगार हा मुद्दा केला होता. तसंच मेक अमेरिका ग्रेट अगेन हा नाराही त्यांनी मागच्या निवडणुकीत दिला होता.
ट्रम्प मोदींना म्हणाले चांगला मित्र, भारताला व्हेंटिलेटर दान करणार
ऍपल कंपनी त्यांचं उत्पादन चीनमधून भारतात हलवण्याच्या विचारात आहे, याबाबत ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मागच्या भाषणात भारताला जागतिक पुरवठादार देश करण्याची संधी असल्याचं सांगितलं. चीनमधून उद्योग भारतात यावेत, म्हणून कामगार कायद्यांमध्येही बदल करण्यात येत आहेत. तसंच उद्योगांसाठी जमिनही कमी किंमतीत देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने बाहेरून उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या उद्योगांसाठी वेगवेगळ्या सुविधा आणि सूट देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांसाठीही राज्य सरकारने रेड कार्पेट टाकलं आहे.