Earth Secrets: महाप्रलयाचे संकेत? आजपासून इतक्या दिवसांनी पृथ्वी उलट्या दिशेने फिरणार?
Earth Secrets: पृथ्वीशी संबंधित अनेक रहस्य अजूनही वैज्ञानिकांसमोर मोठं कोडं आहे. हे कोडं सोडवण्यासाठी जगभरातील वेगवेगळ्या भागांमधील वैज्ञानिक दिवस-रात्र संशोधन करत आहेत. पृथ्वीसंदर्भातील संशोधनामध्ये यापूर्वीच असं दिसून आलं होतं पृथ्वीच्या केंद्राची परिक्रमा एक दिवस पूर्णपणे थांबणार.
Earth Secrets: पृथ्वीसंदर्भातील अनेक रहस्य आजही शास्त्रज्ञांसमोर मोठं कोडं आहे. जीवसृष्टी असणारा आत्तापर्यंतचा एकमेव ज्ञात ग्रह अशी ओळख असलेल्या पृथ्वीबद्दलची अनेक गुपितं आजही उलगडलेली नाही. यासाठी वैज्ञानिक कठोर परिश्रम घेत आहे. पृथ्वी संदर्भातील याच संशोधनामध्ये असं निदर्शनास आलं आहे की पृथ्वीचं केंद्र एक दिवस फिरणं बंद होईल आणि त्यानंतर काही वेळात ते विरुद्ध दिशेने फिरु लागेल. पृथ्वीचं केंद्र परिक्रमा थांबवेल तेव्हा नेमकं काय होईल? यामुळे महाप्रयल येईल का? पृथ्वीच्या केंद्राची परिक्रमा थांबल्यानंतर मोठे भूकंप होतील का? या गोष्टीसंदर्भातील प्रश्नांची उत्तरं आणि पृथ्वीबरोबर असं काही झालं तर नेमकं काय होईल जाणून घेऊयात...
पृथ्वीच्या गर्भाबद्दल जाणून घेऊयात
पहिल्यांदा आपण याबद्दल जाणून घेऊयात की पृथ्वीचं केंद्र म्हणजेच गर्भातील लोह (Earth's Inner Core) हे सातत्याने एका बाजूने गोलगोल फिरत असतं. गरम आणि घन स्वरुपातील लोहापासून बनलेलं पृथ्वीचं केंद्र फिरत असल्याने पृथ्वीवर मॅग्नेटिक फील्ड आणि गुरुत्वाकर्षण तयार होतं. हे केंद्र एकाच दिशेने फिरत असल्याने पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण टिकून आहे. आता हे केंद्र फिरायचं बंद झालं तर काय होईल याबद्दल बोलूयात.
पृथ्वीचं केंद्र फिरतं म्हणून...
वैज्ञानिक आणि भूकंपासंदर्भातील जाणकारांच्या संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की पृथ्वीच्या गर्भाच्या फिरण्याच्या दिशेत म्हणजेच रोटेशन डायरेक्शनमध्ये बदल होणार आहे. मात्र या गर्भाच्या फिरण्याची दिशा बदलण्याआधी काही वेळ ते पूर्णपणे स्थिर असेल. 'नेचर जिओसायन्स'मध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार पृथ्वीचं केंद्र फिरत असल्याने पृथ्वीचा पृष्ठभाग स्थिर आहे. हे केंद्र फिरत असलेल्या दिशेमध्ये दर 70 वर्षांनी बदल होतो. त्यामुळे आजपासून जवळजवळ 17 वर्षानंतर दिशेमधील हा बदल घडून येईल आणि पृथ्वीचं केंद्र आता फिरत आहे त्याच्या विरुद्ध बाजूने फिरु लागेल.
काय परिणाम होणार?
आता याचा काय परिणाम होणार याबद्दल सांगायचं झाल्यास यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर भेगाही पडणार नाही आणि कोणता मोठा प्रयलही येणार नाही. या भौगोलिक घटनेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर परिणाम होणार नाही आणि त्यावर राहणाऱ्या सजीवांवरही परिणाम होणार नाही. यासंदर्भातील संशोधन 1936 साली झालं होतं. डच भूकंप वैज्ञानिक इंगे लेहमॅन यांनी या गोष्टीचा शोध लावला होता.